जिल्हाधिकाऱ्यांच्या नेतृत्वाखाली विद्यार्थ्यांचा सहभाग : बंधुत्वाचे उदात्त धडे देणारे संविधान आपला अभिमान
बेळगाव : भारतीय संविधान एक महान ग्रंथ आहे. सामाजिक, आर्थिक व राजकीय न्याय, विचार, अभिव्यक्ती स्वातंत्र्य, विश्वास, धर्मश्रद्धा, समानता व एकतेचे प्रतीक आहे. त्यामुळे तो महान ग्रंथ आहे, असे गौरवोद्गार बेळगाव उत्तरचे आमदार राजू सेठ यांनी काढले. शुक्रवारी येथील कुमार गंधर्व कलामंदिर येथे संविधान प्रस्तावनेच्या अभिवाचन कार्यक्रमात ते बोलत होते. संपूर्ण राज्यात एकाचवेळी हा कार्यक्रम झाला. बंधुत्वाचे उदात्त धडे देणारे संविधान हा आपला अभिमान आहे. त्याचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा आदर्श प्रत्येकाने घ्यावा, असे आवाहनही आमदार राजू सेठ यांनी केले.
कार्यक्रमात विविध विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. जिल्हाधिकारी नितेश पाटील यांनी संविधानाची प्रस्तावना प्रत्येकाच्या जीवनातील मूल्यांचे जतन करणारी आहे. संपूर्ण जगात इतके मोठे संविधान कोणत्याही देशात नाही. सर्व ग्राम पंचायती, तालुका पंचायती व जिल्हा पातळीवरील कार्यालयात समाजकल्याण खात्याच्या सर्व विद्यार्थी वसतीगृहात संविधानाची प्रस्तावना लावण्यात येणार आहे, असेही जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले. जिल्हा पंचायतीचे मुख्य कार्यकारी अधिकारी हर्षल भोयर, प्रशिक्षणार्थी आयएएस अधिकारी शुभम शुक्ला, मनपा आयुक्त अशोक दुडगुंटी, समाज कल्याण खात्याचे सहसंचालक लक्ष्मण बबली, जिल्हा अनुसूचित जाती विभागाचे कल्याण अधिकारी बसवराज कुरिहुली, शिवप्रिया कडेचुरू, अब्दुल रशीद मिरजन्नावर, राज्य नोकर संघटनेचे जिल्हाध्यक्ष बसवराज रायवगोळ, मल्लेश चौगुले, मल्लेश कुरंगी, यल्लाप्पा हुदली आदी उपस्थित होते. विद्यार्थ्यांनी संविधानाच्या प्रस्तावनेचे सामूहिक अभिवाचन केले.
तालुका पंचायतमध्ये लोकशाही दिन साजरा
तालुका पंचायतमध्ये नुकताच राष्ट्रीय लोकशाही दिन साजरा करण्यात आला. यावेळी नागरिकांच्या कामासाठी आपण सक्षम असून, प्रथम त्यांची कामे करून देण्याबाबत शपथ घेण्यात आली. तालुका पंचायतीच्या सभागृहात हा कार्यक्रम पार पडला. तालुका पंचायतमधील कर्मचारी निलोफर शेख यांनी या दिनाचे महत्त्व सांगून स्वागत केले. निलोफर शेख यांनी शपथ देवविली. कर्मचारी वैजनाथ सनदी यांनी प्रास्ताविक केले. बसवराज पाटील यांनी परिचय करून दिला. ईशस्तवन गीत अपर्णा कित्तूर, शैला दोडमनी व नेत्रावती रजपूत यांनी म्हटले. लोकशाही दिनाची माहिती सुजाता कांबळे, नागराज यरगुद्दी, के. एम. पाटील, श्रीकांत नाजरे यांनी करून दिली. यावेळी प्रसन्ना नर्लेकर, बसवराज शिरशैलमरद, निर्मला अंगडी, वनिता सुर्वेकर, शीतल पाटील, श्रीनिवास हाकाटी, रेश्मा पाटील, द्राक्षयणी करिगौडर, निखिल मारिहाळ, प्रिती दौरण्ण यांच्यासह इतर कर्मचारी उपस्थित होते. हिनाफिरदोस कडोली यांनी आभार मानले.









