मंत्री हेब्बाळकर यांची माहिती : दिव्यांगांना तिचाकींचे वितरण : वस्तुप्रदर्शन-विक्री मेळाव्याचे आयोजन
बेळगाव : आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या निमित्ताने राज्यात प्रथमच तीन हजार गर्भवतींची सामूहिक ओटी भरणे कार्यक्रम, दिव्यांगांना विविध साहित्याचे वितरण तसेच विभाग स्तरावरील स्त्रीशक्ती गटांचे वस्तुप्रदर्शन-विक्री मेळाव्याचे आयोजन सोमवार दि. 24 रोजी सीपीएड मैदानावर करण्यात आले असल्याची माहिती महिला-बाल कल्याण मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांनी दिली. येथील गृह कार्यालयात रविवार दि. 23 रोजी पत्रकार परिषदेत त्या बोलत होत्या. तीन हजार गर्भवतींना साड्या, फुले, फळे, हळदी-कुंकू, बांगड्या अशा 5 वस्तू देऊन शास्त्रोक्त पद्धतीने ओटी भरण्यात येईल. जागतिक दिव्यांग दिन व ज्येष्ठ नागरिक दिनाचे औचित्य साधून एक हजार दिव्यांगांना कार्यक्रमात सहभागी करून घेण्यात येणार असून दिव्यांगांना तिचाकी स्कूटरचे वितरण करण्यात येईल. स्त्रीशक्ती गटांना प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने विभागस्तरावर वस्तुप्रदर्शन-विक्री मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.
बेळगाव, हावेरी, बागलकोट, विजापूर, कारवार, गदग व धारवाड या सात जिल्ह्यांतील स्त्रीशक्ती गटांचे सदस्य व जिल्हा पंचायतीच्या एनआरएलएम अंतर्गत स्त्रीशक्ती गटांचा प्रदर्शनात सहभाग राहणार आहे. प्रदर्शनातील विविध स्टॉलवर हस्तकौशल्यातून बनविलेल्या वस्तू, कापड, खाद्यपदार्थ, बंजारा पोशाख, बांबूपासून तयार करण्यात आलेल्या वस्तू, विविध प्रकारच्या बॅग असतील. या वस्तूंच्या प्रदर्शनाबरोबरच त्या विक्रीसाठीही उपलब्ध असतील. ‘बेटी बचाओ बेटी पढाओ’ कार्यक्रमांतर्गत बालिकेच्या नावे रोप लावणे कार्यक्रमही होईल. नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन त्यांनी केले. पत्रकार परिषदेला विधानपरिषद सदस्य चन्नराज हट्टीहोळी, मंत्री हेब्बाळकर यांचे माध्यम सल्लागार एम. के. हेगडे, महिला-बाल कल्याण खात्याचे उपसंचालक नागराज उपस्थित होते.
सीपीएड मैदानावर आयोजन
जिल्हा प्रशासन, जि. पं., महिला-बाल कल्याण खाते व दिव्यांग-ज्येष्ठ नागरिक सबलीकरण खाते यांच्या संयुक्त विद्यमाने सीपीएड मैदानावर सोमवार दि. 24 रोजी सकाळी 10.30 वाजता कार्यक्रम होणार आहे. जिल्हा पालकमंत्री तथा सार्वजनिक बांधकाम मंत्री सतीश जारकीहोळी यांच्या हस्ते कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात येणार आहे. मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित राहणार आहेत. आमदार राजू सेठ अध्यक्षस्थानी असतील.









