कर्नाटकातील निवडणूक जिंकण्यासाठी भाजप म्हादईचे पाणी वळवत असल्याचा आरोप
प्रतिनिधी /मडगाव
कर्नाटकातील निवडणूक जिंकण्यासाठी भाजप म्हादई नदीचे पाणी वळवत असल्याचा आरोप करताना गोव्याला जर म्हादईचे रक्षण करायचे असेल, तर जनचळवळीशिवाय ते होणार नसल्याचे फातोर्डाचे आमदार विजय सरदेसाई यांनी सांगितले. त्यासाठी जनमत कौलदिनी सांखळी येथे होणाऱया सभेत आपण लोकांसोबत सहभागी होणार असल्याचे त्यांनी सांगितले.
रविवारी चंद्रवाडा, फातोर्डा येथील रस्ता तसेच गटारबांधणी कामाचा शुभारंभ केल्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. यावेळी सरकारने गोमंतकीयांना पाण्यासाठी मोताद करण्याची योजना पुढे नेली असल्याची टीका सरदेसाई यांनी केली. सरकार सर्वांनी एकत्र होणे गरजेचे असल्याचे सांगत आहे. पण का, न्यायालयात जाऊन उभे राहण्यासाठी, जेथे सुनावणीच होत नाही, असे सवाल त्यांनी उपस्थित केले. जनमत कौलाच्या दिवशी सांखळीत जनजागृतीसाठी जी सभा आयोजिण्यात आली आहे त्यास मी उपस्थित लावणार आहे. कारण उत्तरेत लोकांना याचे जास्त विपरित परिणाम सोसावे लागतील. वाळवंटी नदीवर म्हादईचे पाणी वळविल्याने विपरित परिणाम होतील, असे त्यांनी नजरेस आणून दिले.
मुख्यमंत्र्यांनी नोकऱया दिल्या, पैसे वाटले वा मुख्यमंत्री म्हणून मिरविले म्हणून पाणी मिळणार नाही. याबद्दल या भागातील लोकांमध्ये जनजागृती होण्याची गरज आहे. या लोकांवर दडपण आहे, परंतु त्यांच्यात जनजागृतीची आवश्यकता आहे, असे ते म्हणाले. भाजप तसेच काँग्रेस या दोन्ही पक्षांना गोव्याचे पडून गेलेले नाही. कारण कर्नाटकात लोकसभेच्या ज्या 28 जागा आहेत त्यावर त्यांचा डोळा आहे, अशी टीका सरदेसाई यांनी केली.
म्हादईप्रश्नी राज्य सरकार आणि मुख्यमंत्री सर्व आघाडय़ांवर सपशेल अपयशी ठरले आहे. डबल इंजिन गोव्याला न्याय मिळवून देण्यात अपयशी ठरले आहे. पंतप्रधान मुख्यमंत्र्यांचे काहीच ऐकून घेत नाहीत, तर न्यायालयात तातडीने सुनावणी होत नाही, असे सरदेसाई यांनी नजरेस आणून दिले. गोव्याला राजभाषेसाठी रस्त्यावर उतरावे लागले. जनमत कौलासाठी बाहेर पडून मतदान करावे लागले. त्यानंतरच कोकणी राजभाषा बनली व जनमत कौलाद्वारे गोव्याचे स्वतंत्र अस्तित्व राखणे शक्य झाले. हे सर्व जनआंदोलने करूनच साध्य झाले. याचे भान ठेवून जनतेने म्हादई बचावसाठी पुढे येण्याची गरज त्यांनी व्यक्त केली.









