पोलिसांच्या वाहनावर पेट्रोलबॉम्ब फेकण्याची घटना : 400 जणांना अटक
वृत्तसंस्था/ लंडन
ब्रिटनच्या अनेक शहरांमध्ये हिंसक निदर्शने सुरू आहेत. साउथपोर्ट शहरात मागील आठवड्यात एका डान्स पार्टीत झालेल्या हल्ल्यात तीन मुलींच्या मृत्यूनंतर ही हिंसा सुरू झाली असून त्याची तीव्रता वाढतच चालली आहे. आतापर्यंत 17 शहरांमध्ये जाळपोळ आणि पोलिसांसोबत झटापटीचे प्रकार घडले आहेत. उजव्या विचारसरणीचे समर्थक पोलिसांनाही सातत्याने लक्ष्य करत आहेत. पोलीस वाहनांना पेट्रोल बॉम्बद्वारे लक्ष्य करण्यात आले आहे.
समाजकंटकांनी प्लायमाउथ, बर्नले, बर्मिंघम आणि बेलफास्टमध्ये वाहनांना लक्ष्य केले आहे. उत्तर आयर्लंडची राजधानी बेलफास्टमध्ये समाजकंटकांनी पोलीस व्हॅनवर पेट्रोल बॉम्ब फेकले. सँडी रो येथे एका सुपरमार्केटनजीक तैनात करण्यात आलेल्या पोलिसांच्या वाहनाला पेटवून देण्यात आले आहे. काळे कपडे परिधान केलेल्या तरुणांनी पोलिसांच्या वाहनांवर दगडफेकही केली आहे.
जाळपोळ आणि हल्ल्यांच्या या घटनानंतर पोलिसांनी बहुतांश मार्गांवरील वाहतूक रोखली आहे. दक्षिण बेलफास्टच्या डोनेगल रोड भागात सुरू असलेली हिंसा पाहता कठोर पावले उचलण्यात आली आहेत. पोलिसांनी डोनेगल रोड आणि सँडी रो क्षेत्रांमध्ये जाणे टाळण्याचा सल्ला लोकांना दिला आहे.
इंग्लंड आणि उत्तर आयर्लंडच्या काही हिस्स्यांमध्ये 6 दिवसांपर्यंत चाललेल्या दंगलीनंतर सुमारे 400 जणांना अटक करण्यात आली आहे. देशात सुरू असलेल्या हिंसेत अनेक पोलीस अधिकारीही जखमी झाले असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली.
मागील सोमवारी चाकूने करण्यात आलेल्या हल्ल्यात साउथपोर्टमध्ये तीन मुलींच्या हत्येनंतर ही हिंसा भडकली आहे. या हल्ल्यानंतर ऑनलाइन प्लॅटफॉर्मवर अफवा फैलावली की हल्लेखोर मुस्लीमधर्मीय होता आणि तो स्थलांतरित होता. या अफवेनंतर उजव्या विचारसरणीच्या समर्थकांनी मुस्लिमांना लक्ष्य केले आहे. परंतु मुलींचा जीव घेणाऱ्या आरोपीचे नाव एक्सेल रुदाकुबाना असल्याचे समोर आले असून तो 17 वर्षांचा आहे. निदर्शकांना हाताळताना सर्वांना सुरक्षा पुरविण्यात येणार असल्याचे आश्वासन ब्रिटनचे पंतप्रधान स्टार्मर यांनी म्हटले आहे.
भारत सरकारकडून मार्गदर्शक सूचना
लंडनमधील भारतीय उच्चायुक्तांनी भारतीय नागरिकांकरता मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. लंडनमधील भारतीय उच्चायुक्तालय ब्रिटनमधील परिस्थितीवर बारीक लक्ष ठेवून आहे, परंतु येथील सद्यस्थिती पाहता भारतातून ब्रिटनमध्ये आल्यावर सतर्कता आणि सावधानता बाळगावी. स्थानिक सुरक्षा यंत्रणांनी दिलेल्या सूचनांचे पालन करावे. तसेच हिंसाचार सुरू असलेल्या ठिकाणी जाऊ नये असे मार्गदर्शक सूचनांमध्ये म्हटले गेले आहे.









