पालक, हिदुंत्ववादी कार्यकर्त्यांनी विचारला जाब : चौकशी अहवाल देण्याचे मुख्याध्यापकांचे आश्वासन
वास्को : ईस्लामिक स्टुडण्टस् ऑर्गनायझेशनच्या आमंत्रणावरून बायणातील सरकारी उच्च माध्यमिक विद्यालयातील विद्यार्थ्यांनाही झुआरीनगरातील मशिदीमध्ये पाठवण्यात आल्याने पालक तसेच हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांनी मंगळवारी या विद्यालयाच्या मुख्याध्यापकांना जाब विचारला. मुख्याध्यापकांनी यासंबंधी योग्य चौकशीचे आश्वासन या कार्यकर्त्यांना दिले आहे. सोमवारी या प्रश्नावरून दाबोळीच्या केशव स्मृती शाळेमध्ये हंगामा झाला होता. हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांनी या शाळेत एकत्र येऊन प्राचार्य व शिक्षकावर कारवाईची मागणी केली होती. अखेर व्यवस्थापनाने प्राचार्यांना निलंबित करीत असल्याचा आदेश काढला. त्यामुळे तणाव निवळला होता. या प्रकरणी वास्को पोलीस स्थानकात तक्रार दाखल झाल्याने पोलिसांनीही चौकशी हाती घेतली आहे.
बायणातील विद्यार्थ्यांचे मशिद दर्शन
काल मंगळवारी सकाळी हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांनी आपला मोर्चा बायणातील सरकारी उच्च माध्यमिक विद्यालयाकडे वळवला. त्यांची वीस मुले मशिद दर्शनामध्ये सहभागी झाली होती. त्यामुळे या कार्यकर्त्यांनी या शाळेच्या मुख्याध्यापकांची भेट घेऊन त्यांच्याकडेही स्पष्टीकरणाची मागणी केली. यावेळी मुख्याध्यापकांनी या प्रकरणी अनभिज्ञता व्यक्त करीत चौकशी करण्याचे आश्वासन दिले.
ईस्लामिक ऑर्गनायझेशनबाबत संशय
या शाळेतील शिक्षकांनीही विद्यार्थ्यांना कोणतीही चौकशी न करता मशिदीमध्ये घेऊन जाण्याची चूक केलेली असून यात गुंतलेल्यांविरूध्द कारवाई व्हायला हवी अशी मागणी कार्यकर्त्यांनी केली आहे. यासंबंधी कार्यकर्त्यांनी मंगळवारी शिक्षण खात्याकडेही तक्रार केली आहे. शालेय विद्यार्थ्यांना मशिदीमध्ये येण्याचे आमंत्रण देण्यामागे स्टुडण्डस ईस्लामिक ऑर्गनायझेशनचा छुपा अजेंडा असू शकतो, असा संशय हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांनी व्यक्त केला आहे. दरम्यान, मंगळवारी वास्कोतील विविध भागात वास्को पोलिसांनी संचलन करून धार्मिक शांतता राखण्यासाठी तसेच धर्माच्या नावाने कुठेही शांतता बिघडवण्याचा प्रयत्न होऊ नये यासाठी खबरदारी घेतली. यात पोलीस उपअधीक्षक सलीम शेख तसेच पोलीस निरीक्षक कपिल नायक सहभागी झाले होते.
सामाजिक सलोखा उपक्रमाला सहकार्य द्यावे : खान
विद्यार्थ्यांनी मशिदीला भेट देण्याचा उपक्रम हा सामाजिक सलोखा, शांती यासाठी होता आणि तो स्टुडण्ट इस्लामिक संघटनेतर्फे (एसआयओ) गेल्या अनेक वर्षापासून चालू असल्याचा खुलासा करण्यात आला आहे. वास्को येथे झालेल्या या उपक्रमाचा नकारात्मक अर्थ काही समाजविघातक शक्तींनी काढल्याचे एसआयओचे गोवा राज्य अध्यक्ष उस्मान खान यांनी म्हटले आहे. वास्कोतील या प्रकरणाचे तीव्र पडसाद उमटल्यानंतर खान यांनी काल मंगळवारी पणजीत पत्रकार परिषद घेऊन आपली बाजू मांडली. संबंधित उच्च माध्यमिक विद्यालयाच्या प्राचार्यांचे निलंबन रद्द करण्यात यावे. जनतेची दिशाभूल करण्यात येऊ नये. शिक्षण खात्याने अशा उपक्रमांना प्रोत्साहन द्यावे, असे मत खान यांनी मांडले.









