वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
ऑटोमोबाईल क्षेत्रातील दिग्गज कंपनी मारुती सुझुकीने नुकतीच आपली सुव्ह गटातील नवी ब्रिझा कार भारतीय बाजारात सादर केली आहे. सदरची कार ही एस-सीएनजी तंत्रज्ञानावर आधारित आहे. सदरच्या गाडीला के सिरीजचे 1.5 डय़ुअल जेट, डय़ुअल व्हीव्हीटी इंजिन असणार असून या गाडीचे मायलेज 25 किलोमीटर प्रति किलो इतके असणार असल्याचे कंपनीने म्हटले आहे.
सदरची गाडी पाच स्पीड मॅन्युअल ट्रान्समिशनसह सादर झाली असून कंपनीच्या एलएक्सआय, व्हीएक्सआय आणि झेडएक्सआय या तीन मॉडेल्स असून एक मॉडेल डय़ुअल टोन रंगांमध्ये सादर करण्यात आले आहे. इलेक्ट्रिक सनरुफ, क्रूझ कंट्रोलची सोय यात असून स्मार्ट प्ले प्रो इन्फोटेनमेंट सिस्टीम वायरलेस सिस्टीम ऍपल कार प्ले आणि अँड्रॉइड ऑटोसह येणार आहे. सीएनजी इंधनावर आधारित कंपनीच्या जवळपास 14 गाडय़ा लॉन्च करण्यात आल्या असून या एरिना या शोरूमच्या मार्फत विकल्या जात आहेत. एलएक्सआय मॉडेलची किंमत 9 लाखावर, व्हीएक्सआयची किंमत 10 लाख 49 हजार आणि झेडएक्सआय 11 लाख 89 हजारवर तर झेडएक्सआय डय़ुअल टोनची किंमत 12 लाख रुपयांवर असणार आहे.
सीएनजीचा वाटा वाढतोय
अलीकडच्या काळामध्ये पाहता सीएनजीवर आधारित कारची मागणी वाढताना दिसते आहे. याचा लाभ मारुती सुझुकीला चांगलाच उठवता आला आहे. या गटात जास्तीत जास्त कार्स सादर करण्याचे श्रेय मारुती सुझुकीला जाते. मारुती सुझुकी एरिना अंतर्गत जवळपास 24 टक्के इतका वाटा सीएनजी वाहनांनी विक्रीत नोंदला आहे. या गटात इर्टिगा आणि व्हॅगनार यांचा वाटा अनुक्रमे 57 आणि 41 टक्के इतका विक्रीमध्ये नोंदवला गेला आह.s हरित इंधन वापराच्या सरकारच्या आवाहनाला अनुसरून मारुती सुझुकी सीएनजी इंधनावर आधारित कार्स बाजारात दाखल करत आहे. आगामी काळामध्ये यामध्ये वाढही होऊ शकते, असे कंपनीने म्हटले आहे.









