हायब्रिड इंजिनसह अन्य फिचर्सही मिळणार : किंमत 24.79 लाख
नवी दिल्ली :
मारुती सुझुकीने 5 जुलै रोजी भारतात आपली पहिली प्रीमियम एमपीव्ही इनव्हिक्टो गाडी बाजारात दाखल केली आहे. ही कंपनीची सर्वात महागडी कार आहे. कारची सुरुवातीची किंमत 24.79 लाख रुपये आहे तर टॉप व्हेरियंटची किंमत 28.42 लाख रुपयांपर्यंत असणार असल्याची माहिती कंपनीने दिली आहे. याशिवाय इनव्हिक्टो 61,860 रुपयांच्या मासिक सबक्रिप्शनवर देखील घेण्याची सुविधा दिली आहे. कंपनीने कारचे बुकिंग सुरू केले आहे. खरेदीदार 25,000 रुपये भरुन कंपनीच्या अधिकृत वेबसाइट किंवा नेक्सा डिलरशिपवरून एमव्हीपी सेगमेंट कार बुक करु शकतात. ती थेट टोयोटा इनोव्हा हायक्रॉसशी स्पर्धा करणार आहे.
पुढील व मागील बाह्य डिझाइनमध्ये काही बदल
इलेक्ट्रिक पॅनोरमिक सनरूफ, कॅप्टन सीट आणि हायब्रीड इंजिन पर्याय देणारी मारुतीची इनव्हिक्टो ही पहिली कार आहे. याशिवाय, कारमध्ये हवेशीर फ्रंट सीट्स, 8-वे अॅडजस्टेबल ड्रायव्हर सीट, दुसऱ्या रांगेत कॅप्टन सीट, वन टच पॉवर्ड टेलगेट, 50+ कनेक्टिंग फीचर्स, तिसऱ्या रांगेत 3 प्रौढ सीट, 7 आणि 8 सीट पर्याय आहेत.
याशिवाय, कारला ई-सीव्हीटीशी जोडलेल्या सेल्फ-चार्जिंग इलेक्ट्रिक मोटरसह 2.0-लिटर चार-सिलेंडर हायब्रिड पेट्रोल इंजिनचा पर्याय देखील मिळेल. हे इंजिन 186पीएस पॉवर आणि 206 एनएम टॉर्क जनरेट करते. हायब्रीड इंजिनसह 23.24 किलोमीटर प्रतिलिटरचे मायलेज मिळेल. कंपनीचा दावा आहे की कार 9.5 सेकंदात 0 ते 100 किमी/ताशी वेग पकडू शकते.