वाढीसोबत विक्री 1,67,520 युनिट्सवर
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
मारुती सुझुकी इंडियाची ऑक्टोबरमध्ये एकूण विक्री 21 टक्क्यांनी वाढून 1,67,520 युनिट्स झाली असल्याची माहिती मंगळवारी कंपनीने दिली आहे. गेल्या वर्षी याच महिन्यात कंपनीने एकूण 1,38,335 मोटारींची विक्री केली होती.
ऑक्टोबरमध्ये प्रवासी वाहनांची एकूण देशांतर्गत विक्री 1,47,072 युनिट्सवर पोहचली, जी वार्षिक तुलनेत 26 टक्क्यांनी वाढीव मानली जात आहे. वर्षभरापूर्वी याच महिन्यात देशांतर्गत प्रवासी वाहनांची एकूण देशांतर्गत विक्री 1,17,013 युनिट्स इतकी होती.
ऑक्टोबर 2021 मध्ये ‘मिनी सेगमेंट’मधील कारची विक्री 24,936 युनिट्सपर्यंत वाढली. या सेगमेंटमध्ये अल्टो आणि एस-प्रेसो सारख्या मॉडेल्सचा समावेश आहे. बलेनो, सेलेरियो, डिझायर, स्विफ्ट, टूर एस आणि वॅगनआर यासह कॉम्पॅक्ट कारची विक्री गेल्या महिन्यात 73,685 युनिट्सवर पोहोचली. वर्षभरापूर्वी याच महिन्यात हा आकडा 48,690 होता.
इलेक्ट्रॉनिक्स सुटय़ा भागांच्या टंचाईचा वाहनांच्या उत्पादनावर फारसा परिणाम झाला नसल्याचे मारुती सुझुकी कंपनीने म्हटले असून परिणाम कमी करण्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना केल्याचेही स्पष्ट करण्यात आले आहे. कारविक्री करिता त्याचप्रमाणे निर्मिती आणि खरेदी या विभागावरच कंपनीने अधिक भर दिला होता.
समभाग तीन टक्के घसरला
मारुती सुझुकीने ऑक्टोबर महिन्यातील वाहन विक्रीत वाढीची आकडेवारी जाहीर केली असली तरी कंपनीचा समभाग मात्र मंगळवारी शेअर बाजारात तीन टक्के घसरताना दिसला. दिवसा 9649 रुपयांवर असणारा समभाग 2.8 टक्के इतका घसरत 9377 रुपयांवर आला होता.









