अडीच कोटी वाहनांचे उत्पादन ः कंपनीला 40 वर्षे पूर्ण
गुरुग्राम
ऑटोमोबाईल क्षेत्रातील भारतातील सर्वात मोठी कंपनी मारुती सुझुकीने अडीज कोटी वाहनांच्या निर्मितीचा यशस्वी टप्पा नुकताच पूर्ण केला आहे. मारुती सुझुकीचे व्यवस्थापकीय संचालक व सीईओ हिशाशी टेकुची यांनी ही माहिती नुकतीच दिली आहे.
सुझुकीसोबतच्या भागीदारीला मारुतीला यावषी 40 वर्षे पूर्ण होत आहेत. या अनुषंगाने अडीच कोटी वाहनांच्या उत्पादनाचा यशस्वी टप्पा गाठणं हे आमच्यासाठी भाग्याचं आहे. भारतीयांनी दाखवलेल्या अतुट विश्वासावर मारुती सुझुकीने ही यशस्वी कामगिरी केली असल्याचे टेकुची यांनी सांगितले.
सुरुवात….
मारुती सुझुकीने आपल्या उत्पादन प्रक्रियेला 1983 मध्ये सुरुवात केली होती आणि मार्च 1994 मध्ये 10 लाख वाहन उत्पादनाचा टप्पा ओलांडला होता. तर पुढे मार्च 2011 मध्ये एक कोटीचा टप्पा कंपनीने यशस्वीपणे पूर्ण पेला आणि जुलै 2018 मध्ये दोन कोटी वाहन निर्मितीचा विक्रमी टप्पा पार केला होता.
सुरुवातीच्या काळामध्ये कंपनीचा पहिला उत्पादन कारखाना हा गुरुग्राम (हरियाणा) येथे सुरू करण्यात आला होता पण आता कंपनीचे गुरुग्राम आणि मनेसर या ठिकाणी दोन उत्पादन कारखाने असून तेथील वाहन निर्मिती क्षमता वार्षिक तत्त्वावर पाहता 15 लाख इतकी आहे. प्रवासी वाहनांच्या संख्येत होणारी वाढ पाहता कंपनी येणाऱया काळामध्ये खारखोडा (हरियाणा) मध्ये आपला नवा कारखाना सुर करण्याचा विचार करत असून त्या संदर्भातील हालचालींना आता वेग आल्याचेही सांगितले जाते. भारतीय बाजारामध्ये कंपनीची 16 प्रवासी वाहनांची मॉडेल्स असून जवळपास 100 देशांना वाहनांची निर्यात केली जाते.
मनेसारमधील उत्पादन क्षमता 1 लाखाने वाढवणार
याचदरम्यान कंपनी मनेसार येथील कारखान्याची उत्पादन क्षमता वाढवण्याच्या तयारीत असल्याचे समजते. एप्रिल 2024 पर्यंत उत्पादनात 1 लाखाने अतिरीक्त वाढ केली जाणार असल्याचे सांगितले जाते.









