ग्राहकांना आता कार खरेदी करणे होणार सोपे
नवी दिल्ली
मारुती सुझुकी इंडिया या कंपनीने आपल्या ग्राहकांसाठी अगदी सहजपणे कार विकत घेण्यासाठी कर्ज उपलब्ध करुन देण्यासाठी इंडियन बँकेसोबत हातमिळवणी केली आहे. कंपनीने बुधवारी दिलेल्या माहितीनुसार दोघांमध्ये करार झाला आहे.
महानगर, शहर, उपनगर आणि ग्रामीण क्षेत्रांमध्ये इंडियन बँकेच्या जवळपास 5,700 पेक्षा अधिक शाखा कार्यरत असून यांच्यामार्फत मारुतीची गाडी खरेदी करण्यासाठी ग्राहकांना कर्ज वितरीत केले जाणार आहे.
यामध्ये विशेष योजनेच्या अंतर्गत मारुती सुझुकीच्या ग्राहकांना कारच्या ऑन-रोड किमतीच्या 90 टक्केपर्यंत कर्ज उपलब्ध करुन देण्यात येणार असल्याची माहिती आहे. यासोबतच योजनेच्या अंतर्गत शून्य प्रक्रिया शुल्क, 30 लाख रुपयापर्यंत मोफत दुर्घटना विम्याचे कवच, मोफत फास्टॅग आणि 84 महिन्यांपर्यंत परतफेडीचा कालावधी कर्ज घेतलेल्या ग्राहकांना मिळणार आहे. ही योजना 30 जून 2022 पर्यंत राहणार असल्याची माहिती कंपनीने दिली आहे.









