मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत : तेरेखोल येथे हुतात्मा हिरवे गुरुजी, शेषनाथ वाडेकर यांचा स्मारकाचे भूमिपूजन
प्रतिनिधी /मोरजी
राज्यातील पुरातन किल्ले आणि हुतात्मा स्मारक पुनर्बांधणी करून विकास केला जाईल. अशी ग्वाही मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी तेरेखोल येथे दिली. केरी तेरेखोल येथे हुतात्मा हिरवे गुरुजी आणि शेषनाथ वाडेकर यांचा स्मारकाचे भूमिपूजन मुख्यमंत्र्यानी केले. सुमारे 12 लाख रुपये खर्चून हे स्मारक उभारण्यात येणार आहे.
यावेळी स्थानिक आमदार जीत आरोलकर, पेडणे मतदारसंघाचे आमदार प्रवीण आर्लेकर, जीवनदायिनी संस्थेचे अध्यक्ष नाना उर्फ नारायण सोपटे केरकर, हिरवे गुरुजींचे सुपुत्र प्रदीप हिरवे व त्यांच्या कुटुंबातील अन्य सदस्य व अन्य मान्यवर उपस्थित होते.
….तर स्वातंत्र्य सैनिक हुतात्मा झालेच नसते!
भारत देश स्वातंत्र 1947 झाला आणि त्यानंतर गोवा मुक्तीसाठी लढा सुरू झाला त्यात अनेकांचे बळी गेले. तत्कालीन केंद्र सरकारने गोवा मुक्तीसाठी ठोस पावले उचलली असती तर त्यावेळी गोव्यातील स्वातंत्र्य सैनिकांवर गोळीबार झाला नसता, त्यांच्यावर आहुती देण्याचा प्रसंग आला नसता, असे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यावेळी म्हणाले .
आपल्या कारकिर्दीत हे स्मारक उभे राहात असल्याचा आनंद आहे, असे मुख्यमंत्री डॉ. सावंत म्हणाले. गोवा मुक्तीच्या साठाव्या वर्षाच्या निमित्ताने राज्यभर विविध प्रकारचे कार्यक्रम होत असताना ही स्मारक उभे राहात आहेत. त्यातून हिरवे गुरुजी आणि शेषनाथ वाडेकर यांच्या स्मृतींना उजाळा मिळणार आहे. शिवाय या पवित्र स्थळी दरवषी गोवा मुक्तिदिन किंवा भारत स्वातंत्र्याच्या दिनी या ठिकाणी सरकारी पातळीवर कार्यक्रम केले जातील, असेही जाहीर मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी केले.
मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी पुढे म्हणाले, ज्या हुतात्म्यांनी आपल्या घर संसारावर दुर्लक्ष करून आपल्या गोव्याच्या आणि भारताच्या स्वातंत्र्य लढय़ात आहुती दिली. त्याची चांगली फळे चाखण्याची संधी मिळाली आहे. अशा थोर स्वातंत्र्य सैनिकांच्या स्मृती आपल्या स्मरणात कायम राहणार. राज्यात ज्या ज्या ठिकाणी हुतात्मा स्मारकांची गरज आहे. त्या त्या ठिकाणी हुतात्मा स्मारक उभारले जाणार आहे. तेरेखोल येथे हिरवे गुरुजी व शेषनाथ वाडेकर या हुतात्म्यांची स्मारके उभारून त्यांना याठिकाणी दरवर्षी आदरांजली वाहिली जाईल.
तेरेखोल येथे हिरवे गुरुजी आणि हुतात्मा शेषनाथ वाडेकर यांचे स्मारक व्हावे, यासाठी अनेकवेळा प्रयत्न केले जीवनदायिनी संस्थेने वेळोवेळी सरकारला निवेदन सादर केले तसेच हिरवे गुरुजीच्या कुटुंबीयांनी सरकारची भेट घेऊन त्यांना निवेदन सादर करून स्मारक उभारण्याची मागणी केली होती. या मागणीची दखल घेत मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी या स्मारकाचे भूमिपूजन केल्याबद्दल आमदार जीत आरोलकर यावेळी समाधान व्यक्त केले. मुख्यमंत्र्यांनी तेरेखोल केरी हा अर्धवट असलेल्या पुलालाही चालना द्यावी, अशी मागणी आमदार आरोलकर यांनी यावेळी केली.
हिरवे गुरुजी यांचे सुपुत्र प्रदीप हिरवे म्हणाले, आज हिरवे गुरुजींची जयंती आहे. त्या निमित्ताने गोवा सरकारने या ठिकाणी स्मारक उभारण्याचा निर्णय घेतलेला आहे. त्या निर्णयाचे आम्ही स्वागत करतो. याबाबत हिरवे कुटुंबीय सरकारचे जन्मोजन्मी राहणार ऋणी असल्याचे सांगून या ठिकाणी दरवषी कार्यक्रम होण्यासाठी एखादे सभागृह उभारावे, अशी अपेक्षा प्रदीप हिरवे यांनी यावेळी व्यक्त केली. न्यू इंग्लिश हायस्कूलच्या विद्यार्थ्यांनी स्वागतगीत सादर केले. आत्माराम बर्वे यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.









