मध्यवर्ती म. ए. समितीची बैठक : महाराष्ट्रात होणाऱ्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी चलो मुंबईचा नारा
प्रतिनिधी /बेळगाव
सीमालढ्यातील हुतात्म्यांना अभिवादन करण्यासाठी 17 जानेवारी रोजी सीमाभागात हुतात्मा दिन आयोजित केला जातो. बेळगाव शहरासह कंग्राळी खुर्द येथे हुतात्मा दिनानिमित्त कार्यक्रम होतो. यावर्षीचा हुतात्मा दिन संपूर्ण सीमाभागात गांभीर्याने पाळला जाईल, असा निर्णय मध्यवर्ती म. ए. समितीच्या बैठकीत घेण्यात आला.
शुक्रवारी मराठा मंदिर येथे झालेल्या बैठकीमध्ये विविध विषयांवर चर्चा करण्यात आली. कोल्हापूर येथे सीमा परिषद भरविण्यासाठी चर्चा करण्यात आली होती. त्यानुसार लवकरच एक शिष्टमंडळ कोल्हापूरला जाऊन नेत्यांची भेट घेणार आहे. अनेकवेळा आंदोलन करूनदेखील महाराष्ट्र सरकार केवळ पाठीशी आहे, हे इतकेच सांगत आहे. परंतु महाराष्ट्र सरकारला सीमालढ्याची जाणीव करून देण्यासाठी महाराष्ट्रात होणाऱ्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी चलो मुंबईचा नारा देण्याबाबत चर्चा करण्यात आली.
एकाही मंत्र्याची वकिलांशी चर्चा नाही
महाराष्ट्र सरकारने सीमाभागासाठी समन्वय मंत्र्यांची नेमणूक केली. आतापर्यंत 7 समन्वय मंत्री नेमण्यात आले. परंतु एकाही मंत्र्याने आजतागायत सीमाप्रश्नाचा खटला चालविणाऱ्या वकिलांशी चर्चा केलेली नाही. तसेच सीमाभागासाठी निधीची घोषणा केली जात असली तरी प्रत्यक्षात तो निधी कोणत्या विभागाकडून मिळणार आहे, यासंदर्भात स्पष्टता नाही. मध्यवर्ती म. ए. समितीने आतापर्यंत 80 अर्ज अनुदानासाठी महाराष्ट्र सरकारकडे पाठविले आहेत. अण्णासाहेब पाटील विकास महामंडळ व महात्मा फुले आरोग्य योजना राबविण्यामध्ये तांत्रिक अडचणी येत असल्याने याबाबत महाराष्ट्र सरकारशी चर्चा केली जात असल्याचे सांगण्यात आले.
यावेळी मध्यवर्ती म. ए. समितीचे कार्याध्यक्ष मनोहर किणेकर, सरचिटणीस मालोजी अष्टेकर, खजिनदार प्रकाश मरगाळे, अॅड. एम. जी. पाटील, रणजित चव्हाण-पाटील, बी. डी. मोहनगेकर, नानू पाटील, बी. एस. पाटील, सुनील आनंदाचे, मनोहर हुक्केरीकर, खानापूर म. ए. समितीचे अध्यक्ष गोपाळ देसाई, कार्याध्यक्ष यशवंत बिर्जे, सदानंद बेडरे यांसह इतर पदाधिकारी उपस्थित होते.
राष्ट्रीय पक्षांच्या उमेदवारांचा प्रचार करण्यासाठी महाराष्ट्रातील लोकप्रतिनिधींनी येवू नये!
सीमाभागातील नागरिक महाराष्ट्रात येण्यासाठी 67 वर्षांपासून लढा देत आहेत. लवकरच बेळगावमधील विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत. त्यामुळे बेळगावमधील राष्ट्रीय पक्षांच्या उमेदवारांचा प्रचार करण्यासाठी महाराष्ट्रातील लोकप्रतिनिधींनी येवू नये, तसेच सभा घेऊ नये. ज्या महाराष्ट्राकडे सीमाभागातील लोक आशेच्या नजरेने पाहतात त्यांनीच बेळगावमध्ये येवून म. ए. समितीच्या विरोधात प्रचार करू नये, असा ठराव मांडण्यात आला.
खानापूर म. ए. समितीवर शिक्कामोर्तब
खानापूर म. ए. समितीमध्ये एकी व्हावी यासाठी मागील अनेक वर्षांपासून प्रयत्न सुरू होते. यासाठी मध्यंतरी एक कमिटी स्थापन करून खानापुरातील गावागावात कार्यकर्त्यांचा अभिप्राय जाणून घेण्यात आला. त्यानुसार दोन दिवसांपूर्वी नूतन कार्यकारिणीची निवड करण्यात आली. नूतन कार्यकारिणीचे सदस्य शुक्रवारी मध्यवर्ती म. ए. समितीच्या बैठकीला उपस्थित होते. या बैठकीत नूतन कार्यकारिणीवर शिक्कामोर्तब करत खानापूर म. ए. समितीतील बेकीला कायमचे दूर करण्यात आले.









