चकमकीत झाले होते जखमी
वृत्तसंस्था/ शामली
उत्तरप्रदेशच्या शामलीमध्ये मंगळवारी झालेल्या चकमकीत 4 गुंडांना यमसदनी पाठविणारे युपी एसटीफचे शूर अधिकारी सुनील कुमार यांना हौतात्म्य प्राप्त झाले आहे. चकमकीदरम्यान पोलीस अधिकाऱ्याला अनेक गोळ्या लागल्या होत्या. गंभीर जखमी अधिकाऱ्याला गुरुग्रामच्या मेदांता रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. जेथे बुधवारी दुपारी त्यांनी अखेरचा श्वास घेतला आहे. सुनील यांना तीन गोळ्या लागल्या होत्या.
शामलीच्या झिंझानामध्ये चार गुंडांनी एसटीएफवर गोळीबार केला होता. या चकमकीत कुख्यात गुंड अरशद समवेत 4 जण मारले गेले होते. अरशद हा मुस्तफा उर्फ कग्गा गँगचा म्होरक्या होता आणि त्याच्या विरोधात एक लाख रुपयांचे इनाम घोषित होते. या चकमकीत अरशदसोबत मंजीत, सतीश आणि मनबीर हे मृत्युमुखी पडले होते. या गुंडांच्या मृतदेहाजवळून एक कार्बाइन, दोन पिस्टल, काडतूसे हस्तगत करण्यात आली होती.









