इस्रायलकडून हमासविऊद्धचा लढा तीव्र : जमीन, समुद्र, आकाशातून हल्ला
► वृत्तसंस्था/ तेल अवीव
इस्रायल-हमास युद्धाच्या नवव्या दिवसानंतर इस्रायली संरक्षण दलाचे 10 हजारहून अधिक सैनिक गाझामध्ये थेट जमिनीवर हल्ला करण्याच्या तयारीत आहेत. सीमेवर शेकडो इस्रायली रणगाडे तैनात आहेत. उत्तर गाझा रिकामे करण्यासाठी इस्रायलने लोकांना दिलेली मुदतही संपली आहे. आता आम्ही गाझामध्ये जमिनीवर हल्ला करण्यास सज्ज आहोत. आतापर्यंत आम्ही हवाई हल्ले करत होतो, पण आता आम्ही गाझावर तिन्ही बाजूंनी (जमीन, समुद्र आणि आकाश) हल्ला करणार आहोत, असे इस्रायलच्या संरक्षण दलाने रविवारी जाहीर पेले. दुसरीकडे, युद्धात आत्तापर्यंत हमासचे ती टॉप कमांडर मारले गेले आहेत. तसेच इस्रायलसाठी लाढणाऱ्या भारतीय वंशाच्या तीन महिला योद्ध्यांनाही युद्धात प्राण गमवावे लागले असून सदर महिला महाराष्ट्राशी संबंधित असल्याचे स्पष्ट झाले आहे.
गेल्या आठवड्यापासून भडकत असलेला संघर्ष नजिकच्या काळात अधिकच भडकू शकतो. आता पूर्ण क्षमतेने गाझापट्टीवर जमीन, समुद्र, आकाशातून हल्ला करण्याची मोहीम तीव्र होऊ शकते. गाझापट्टीतून सर्वसामान्य नागरिकांना बाहेर पडण्यासाठी दिलेली मुदत समाप्त झाली आहे. याचदरम्यान इस्रायली सीमेला लागून असलेल्या शहरातून सुमारे 15 हजार लोकांना सुरक्षितस्थळी हलवण्यात आले आहे.
इस्रायलच्या वेळेनुसार सर्वसामान्य लोकांना परिसर रिकामा करण्यासाठी 10 ते 1 वाजेपर्यंतची अंतिम तीन तासांची मुदत देण्यात आली होती. या वेळेत इस्रायलकडून कोणताही हल्ला झाला नाही. मात्र, रविवारी पुन्हा हिजबुल्ला संघटनेने इस्रायलच्या सीमावर्ती भाग असलेल्या शतुला येथे लेबनॉनमधून हवाई हल्ला केला. यामध्ये एका इस्रायली सैनिकाचा मृत्यू झाला. यानंतर इस्रायलनेही प्रत्युत्तर देण्यास सुऊवात केली आहे. तेथे बफर झोन तयार करण्यात आला आहे. हमासचे हस्तक गाझा शहर रिकामे करण्यापासून लोकांना रोखत आहेत. लोकांनी शहराबाहेर जाऊ नये म्हणून त्यांनी ठिकठिकाणी गतिरोधक लावले आहेत, असा दावा इस्रायलने केला आहे.
‘हमास’च्या तीन बड्या कमांडरांचा खात्मा
इस्रायलने हमासला ठेचून काढण्यासाठी जोरदार प्रयत्न चालवले असून आतापर्यंत 3 हमास कमांडर मारले गेले आहेत. इस्रायलच्या सैन्याने किबुत्झ निरीम आणि किबुत्झ नीर ओझ येथे हल्ले करणाऱ्या हमास कमांडरला ठार केले. तसेच हमासच्या नुखबा युनिटचा कमांडर बिलाल अल-केद्रा मारला गेल्याचे इस्रायलच्या लष्कराकडून सांगण्यात आले. मारल्या गेलेल्या कमांडरनी इस्रायलवर हमासने केलेल्या अनेक प्राणघातक हल्ल्यांचे नेतृत्व केले होते. 7 ऑक्टोबर रोजी इस्रायलवर झालेल्या हल्ल्याचे नेतृत्व करणारा कमांडर अली कादीचा त्यांनी खात्मा केल्याचे लष्कराने म्हटले आहे. अली कादीला मारण्याचे काम इस्रायलच्या अंतर्गत गुप्तचर संस्थेने शिन बेटने केले होते. त्याचवेळी इस्रायलच्या हल्ल्यात हमासचा हवाई दल प्रमुख मुराद अबू मुरादही मारला गेला होता.
युद्धविरामासाठी हालचाली
दरम्यान, युद्धविरामासाठी प्रयत्न सुरू आहेत. रशियाने संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेला इस्रायल आणि हमास यांच्यातील युद्धविरामावर चर्चा करण्यास सांगितले आहे. त्याचवेळी अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री अँटोनी ब्लिंकन यांनी सौदी अरेबियाचे क्राउन प्रिन्स मोहम्मद बिन सलमान यांची भेट घेतली आहे. वृत्तानुसार, युद्धविरामासाठी अरब देशांमध्ये चीनचा प्रभावही वापरला जात आहे. मात्र, आता इस्रायल गाझामध्ये जे काही करत आहे ते स्वसंरक्षणाच्या पलीकडे असल्याचेही चीनने म्हटले आहे. ‘ऑर्गनायझेशन ऑफ इस्लामिक कोऑपरेशन’ अंतर्गत अनेक इस्लामिक देशांनी युद्धावर चर्चा करण्यासाठी सौदी अरेबियामध्ये ‘तातडीची असाधारण बैठक’ही बोलावली आहे.
गाझापट्टीमध्ये ‘समन्वित’ हल्ल्याची योजना
इस्रायली लष्कर आता हमासच्या ताब्यात असलेल्या गाझा पट्टीमध्ये ‘समन्वित’ हल्ला करण्याच्या तयारीत आहे. उत्तर गाझामध्ये राहणाऱ्या 10 लाखाहून अधिक लोकांना अपेक्षित हल्ल्यापूर्वी भागातून सुरक्षित बाहेर पडण्याची सूचना करण्यात आली होती. इस्रायलने यापूर्वीच गाझाला अन्न, पाणी आणि वीजपुरवठा खंडित केला आहे. दरम्यान, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी नागरिकांच्या सुरक्षेवर भर दिल्याने इस्रायलविऊद्धच्या प्रतिकूल कारवाया रोखण्यासाठी अमेरिकेने भूमध्य समुद्रात आपली दुसरी विमानवाहू नौका ‘यूएसएस ड्वाइट डी आयझेनहॉवर’ तैनात केली आहे.
हुतात्मा महिला सैनिकांचे महाराष्ट्राशी नाते
‘हमास’विऊद्धच्या युद्धात मूळच्या भारतीय असलेल्या तीन महिला सैनिकांना प्राण गमवावे लागले. हुतात्मा झालेल्या भारतीय वंशाच्या महिला ज्यू समुदायातील होत्या. त्यांचे पालक महाराष्ट्रातून स्थलांतरित होऊन इस्रायलमध्ये स्थायिक झाले होते पण त्यांचा जन्म इस्रायलमध्येच झाला. इस्रायलने गाझा सीमेवर महिला सैनिकही तैनात केले आहेत. सीमेवर भारतीय वंशाच्या महिलाही तैनात होत्या. गाझा पट्टीत कार्यरत असलेल्या हमास या दहशतवादी संघटनेने 7 ऑक्टोबरच्या सकाळी दक्षिण इस्रायलमध्ये प्राणघातक हल्ला केल्यापासून दोन्ही बाजूंमधील युद्ध वाढत आहे. इस्रायली सैन्य आणि पोलीस दलात कार्यरत असलेल्या भारतीय वंशाच्या महिला दहशतवाद्यांशी लढताना हुतात्मा झाल्या. हमासविऊद्धच्या या युद्धात प्रथमच मूळ भारतीय वंशाच्या महिला हुतात्मा झाल्याचे सांगण्यात येत आहे.









