वृत्तसंस्था/ आग्रा
उत्तरप्रदेशच्या आग्रा येथे पॅरा जम्पिंग ट्रेनिंगदरम्यान मोठी दुर्घटना घडली आहे. तेथे 8 हजार फुटांच्या उंचीवरून उडी घेतलेल्या नौदलाच्या कमांडोला हौतात्म्य प्राप्त झाले आहे. कमांडोर अंकुर शर्मा यांचा पॅराशूट उच्चदाबाच्या तारांमध्ये अडकला होता. यामुळे अंकुर शर्मा हे होरपळले होते. त्यांना सैन्य रुग्णालयात दाखल करण्यात आले होते, जेथे गुरुवारी रात्री उशिरा त्यांचा मृत्यू झाला आहे. ही दुर्घटना गुरुवारी रात्री मलपुरा ड्रॉपिंग झोनपासून 2 किलोमीटर अंतरावर घडली आहे. विमानातून झेपावलेल्या कमांडोला मलपुरा झोनमध्ये लँडिंग करायचे होते, परंतु जोरदार वाऱ्यांमुळे कमांडोचा पॅराशूट 2 किलोमीटर अंतरावरील विजेच्या तारांमध्ये अडकला होता. जम्मू-काश्मीरचे रहिवासी असलेले नौदल कमांडो अंकुर शर्मा हे पॅराशूट जम्पच्या प्रशिक्षणासाठी काही दिवसांपूर्वीच आगरा वायुतळावर दाखल झाले होते. या दुर्घटनेप्रकरणी पोलीस तपास करत आहेत.









