बेळगावः संयुक्त महाराष्ट्रासाठी हौतात्म्य पत्करलेल्या मारुती बेन्नाळकर यांच्या पत्नी लक्ष्मी बेन्नाळकर यांना केएलई हॉस्पिटलमध्ये 17 एप्रिल रोजी दाखल करण्यात आले आहे. त्यांची पेन्शन गेल्या दोन वर्षांपासून बंद असून त्यांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. सध्या उपचारासाठी त्यांना आर्थिक साहाय्याची गरज आहे.
काही महिन्यांपूर्वी शिवसेनेच्या पदाधिकाऱयांनी बेन्नाळकर कुटुंबीयांची भेट घेऊन त्यांना 50 हजार रुपयांची मदत केली होती. पेन्शन सुरू करण्यासाठी प्रयत्न करू, अशी ग्वाहीही दिली होती. मात्र, अजूनही पेन्शन सुरू न झाल्याने बेन्नाळकर यांना आर्थिक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. आपल्या आजोबांनी दिलेल्या हौतात्म्याची जाणीव ठेवून आजीला पेन्शन मिळावी, अशी अपेक्षा त्यांचे नातू जितेश किरण मेणसे यांनी व्यक्त केली आहे.









