केरळ स्फोटाचे धागेदोरे उघड : चर्चमध्ये चार ठिकाणी पेरले होते आयईडी : तपास यंत्रणांची माहिती संशयाचा धूर…
वृत्तसंस्था/ एर्नाकुलम, नवी दिल्ली
केरळमधील एर्नाकुलम जिह्यातील कलामासेरी भागात रविवारी सकाळी यहोवाच्या साक्षीदारांच्या सभेत झालेल्या स्फोटाने संपूर्ण देश हादरला. हा स्फोट घडवून आणणाऱ्या आरोपीलाही अटक करण्यात आली आहे. आता चर्चमधील स्फोटासाठी चार आयईडी वापरण्यात आल्याची माहिती मिळाली आहे. तपास यंत्रणांच्या सूत्रांनी याची पुष्टी केली आहे. दरम्यान, या प्रकरणातील प्रमुख संशयित डोमिनिक मार्टिन याने बॉम्बस्फोटांची जबाबदारी स्वीकारली आहे. त्याने आपल्या घरी आयईडी गोळा केले आणि बॉम्ब बनविण्याचे तंत्रज्ञान शिकण्यासाठी इंटरनेटचा वापर केला, असेही पोलीस तपासात स्पष्ट झाले आहे.
केरळमधील एका ख्रिश्चन समुदायाच्या कार्यक्रमात रविवारी सकाळी सभागृहामध्ये चार ते पाच स्फोट घडवण्यात आले होते. हे स्फोट घडवण्यासाठी प्राथमिक फॉरेन्सिक विश्लेषणानुसार, आयईडी कमी दर्जाच्या स्फोटकांपासून बनवल्यानंतर आगीचा भडका उडण्यासाठी पेट्रोलचा वापर करण्यात आला होता, असे स्पष्ट झाले आहे. या स्फोटात पेट्रोलचा वापर करून प्रार्थनागृह जाळण्याचा हेतू होता. तपास पथकांनी घटनास्थळावरून बॅटरी, वायर, सर्किट आणि मोबाईल फोन जप्त केले आहेत. स्फोटाचे आणखी काही महत्त्वाचे धागेदोरे उलगडण्यासाठी आणि महत्त्वपूर्ण पुरावे शोधण्यासाठी घटनास्थळी विविध तपास अधिकाऱ्यांकडून शोध घेतला जात आहे.
मार्टिनची कसून चौकशी
सहा वर्षांपूर्वी यहोवाच्या साक्षीदारांना सोडून गेलेल्या मार्टिनविरुद्ध कोणतीही तत्काळ कारवाई करण्यात आलेली नाही, असे आतापर्यंतच्या तपासात दिसून आले आहे. मार्टिनने सोशल मीडियावरील व्हिडीओद्वारे स्फोटाची कबुली देण्याबरोबरच सर्व आक्षेपार्ह पुरावे पोलिसांना दिल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. केरळ पोलिसांना राष्ट्रीय तपास यंत्रणा (एनआयए) आणि नॅशनल सिक्मयुरिटी गार्डच्या (एनएसजी) बॉम्ब डेटा सेंटरद्वारे तपासात मदत केली जात आहे. एनएसजीचा स्फोटानंतरचा विश्लेषण अहवाल लवकरच केंद्रीय गृह मंत्रालयाला सादर केला जाण्याची अपेक्षा आहे.
रविवारपासून व्हेंटिलेटरवर असलेल्या 12 वषीय मुलाचा सोमवारी मृत्यू झाल्याने या स्फोटातील मृतांची संख्या तीन झाली आहे. इतर काही जणांची प्रकृती गंभीर आहे. त्यांनाही भाजलेल्या जखमा झाल्यामुळे स्फोटकांमध्ये आग लावणारी उपकरणे व वस्तू वापरल्याचे स्पष्ट होत आहे. सद्यस्थितीत मार्टिनने हे स्फोट घडवून आणल्याचे केंद्रीय एजन्सीज मानत असल्या तरी या कारस्थानात त्याला अन्य कोणाचे सहकार्य लाभले की नाही, याची शहानिशा केली जात आहे.
मृतांची संख्या 3 वर
केरळमधील एर्नाकुलममधील कलामासेरी येथील कन्व्हेन्शन सेंटरमध्ये झालेल्या स्फोटात आतापर्यंत तीन जणांचा मृत्यू झाला आहे. रविवारी रात्रीपर्यंत मृतांची संख्या दोन होती, नंतर एका 12 वर्षांच्या मुलाचा मृत्यू झाल्यामुळे या घटनेतील मृतांची संख्या तीन झाली. तसेच 50 हून अधिक लोक जखमी झाले असून त्यांच्यावर ऊग्णालयात उपचार सुरू आहेत. या घटनेबाबत गृहमंत्री अमित शहा यांच्याशी चर्चा करणारे मुख्यमंत्री पिनराई विजयन यांनी काही जखमींची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगितले. साखळी स्फोटावेळी सभागृहात 2,000 हून अधिक लोक यहोवाच्या साक्षीदारांच्या परिषदेला उपस्थित होते.
आयएसआयएस मॉड्यूलचा संशय
केरळ साखळी बॉम्बस्फोटात, आयपीसीच्या कलम 302 आणि 307 अंतर्गत एफआयआर नोंदवण्यात आला आहे. तसेच या प्रकरणात आतापर्यंत अज्ञात लोकांविरुद्ध ‘युएपीए’ लागू करण्यात आला आहे. तसेच गुप्तचर संस्था केरळ बॉम्बस्फोट तपासात आयएसआयएस मॉड्यूलवर लक्ष ठेवून आहेत. प्राथमिक तपासात हा दहशतवादी हल्ला असल्याचे स्पष्ट होते. मात्र, केवळ एक व्यक्ती असे कारस्थान रचू शकत नाही, असे स्पष्ट होत असल्याने मार्टिनला सहकार्य करणाऱ्यांपर्यंत पोहोचण्याचे आव्हान तपास यंत्रणांसमोर आहे.









