आई-वडिलांच्या भांडणात दोन्ही मुले पोरकी झाल्याने सर्वत्र हळहळ
वार्ताहर/शिराळा
बेलदारवाडी (ता. शिराळा) येथे चारित्र्याच्या संशयावरून पत्नी स्वाती प्रकाश शेवाळे (वय 26) हिचा पतीने गळा आवळून खून केल्याची घटना घडली आहे. तर संशयित आरोपी पती प्रकाश आनंदा शेवाळे (वय 32) हा घटनास्थळावरून पसार झाला आहे. याबाबत फिर्याद मयत स्वाती यांची आई वत्सला हणमंत चव्हाण (वय 48, रा. मलकापूर कराड, मुळगाव गुंजेवाडी, जि. उस्मानाबाद) यांनी शिराळा पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. दरम्यान स्वाती व प्रकाश यांना दोन मुले असून मुलगा अथर्व (वय 4) तर मुलगी आराध्य (वय 2) ही आई वडिलांच्या भांडणात पोरकी झाल्याने हळहळ व्यक्त केली जात आहे.
शिराळा पोलिस ठाण्यातून मिळालेली माहिती अशी की, प्रकाश शेवाळे हा पत्नी स्वाती हिच्यावर चारित्र्याचा संशय घेत होता. याच कारणावरून प्रकाशने गुरुवार दिनांक 10 ते शुक्रवार दिनांक 11 वाजण्यापूर्वी बेलदारवाडी येथील राहत्या घरी पत्नी स्वाती हिचा गळा दाबून खून केला. तर घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी की, प्रकाश हा कराड येथे पत्नी व दोन मुलांसह राहण्यास होता. तेथे तो मोलमजुरी करून गुजराण करत होता. त्याचे आईवडील बेलदारवाडी येथील मुळगावी राहत असून वडिल आनंदा यांना दम्याचा त्रास आहे. यासाठी गुरुवार दि 10 रोजी त्यांना कोल्हापूरच्या सीपीआर रुग्णालयात प्रकाशची आई रंजना या घेऊन गेल्या होत्या. म्हणून प्रकाश व पत्नी स्वाती हे दोघेही दवाखान्यात गेले व दोघेही आईवडिलांसह बेलदारवाडी येथे मुक्कामास आले. सर्वांनी संध्याकाळी नऊ वाजता एकत्रित जेवण केले. वडिल आजारी असल्याने आई शेजारी वडिलांच्या खोलीत झोपण्यासाठी गेली व सकाळी लवकर उठून जनावरांना वैरण करण्यासाठी शेतात गेली. शेतामधील कामे आवरुन त्या सकाळी नऊ वाजता घरी आल्या तर मुलगा व सून यांच्या खोलीचं दार बंद होतं. त्यांनी आवाज दिला तर प्रतिसाद न मिळाल्याने दरवाजे ढकलून पाहिला असता सून स्वाती या निपचित होऊन पडल्याचे निदर्शनास आले. तर मुलगा प्रकाश तेथून पसार झाला होता. याबाबत पोलिस पाटील योगेश मस्करी यांनी शिराळा पोलिसांना कळवले.
संशयित आरोपी प्रकाश शेवाळेने स्वाती शेवाळे यांच्या मृतदेहाशेजारी चिठ्ठी लिहून ठेवली आहे की, मी माझी पत्नी स्वाती हिचा गळा आवळून खून केला असून यात माझ्या घरच्या किंवा स्वाती हिच्या घरच्या कोणालाही दोषी धरु नये. प्रकाशने आपला मोबाईलही स्वाती यांच्या मृतदेहाशेजारी ठेवून पलायन केले आहे.
यावेळी उपविभागीय पोलिस अधिकारी अश्विनी शेंडगे यांनी घटनास्थळी भेट दिली. पोलीस निरीक्षक सुरेश चिल्लावार, सहायक पोलिस निरीक्षक अविनाश वाडेकर, पोलिस उपनिरीक्षक जयनाथ चव्हाण, पोलिस फौजदार गणेश झांजरे, विनोद जाधव, दिपक हांडे, भाऊसो कुंभार, सुभाष पाटील, कालिदास गावडे यांनी संशयित आरोपी प्रकाश शेवाळेचा शोध घेतला परंतु तो अद्याप सापडलेला नाही. पुढील तपास पोलीस निरीक्षक सुरेश चिल्लावार करत आहेत.
दुर्दैवी आईवडील
प्रकाश यांचे वडील आनंदा व आई रंजना हे वयस्कर व आजारी आहेत. त्यांचा लहान मुलगा विकास शेवाळे हा ट्रक ड्रायव्हर म्हणून काम करत होता. त्यानेही तीन वर्षांपूर्वी दीपावलीच्या दरम्यान याच घरात व याच खोलीत गळफास लावून घेऊन आत्महत्या केली होती. त्या धक्क्यातून हे वृध्द दाम्पत्य अजून सावरलेले नाहीत तोपर्यंत दीपावलीच्या दरम्यानच अवघ्या तिसऱया वर्षी मोठा मुलगा प्रकाशने त्याच खोलीत सून स्वातीचा गळा आवळून खून केल्याने म्हातारपणीचा आधारवड हरपलाच शिवाय लहान नातवंडेही पोरकी झाली.