कराड :
प्रेमप्रकरणातून 27 वर्षीय महिलेवर कोयत्याने सपासप वार झाल्याची घटना आगाशिवनगर येथे भरदुपारी घडली. मलकापूर नगरपरिषदेच्या जलशुद्धीकरण केंद्रासमोरील चौकात दांगड वस्तीत झालेल्या हल्ल्यामुळे संबधित विवाहित महिला रक्ताच्या थारोळ्यात कोसळली होती.
हल्लेखोराने घटनास्थळावरून पलायन केल्यानंतर गंभीर जखमी महिलेस नागरिकांनी रिक्षातून तातडीने कृष्णा रूग्णालयात हलवले. याप्रकरणी संशयित हल्लेखोर रवींद्र सुभाष पवार (वय 31, रा. आगाशिवनगर, ता. कराड) याच्यावर रात्री उशिरा गुन्हा दाखल झाला आहे.
याबाबत पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, आगाशिवनगरच्या दांगट वस्तीत एक विवाहित महिला माहेरी वास्तव्यास आहे. गुरूवारी दुपारी संबधित महिला कामानिमित्त घराबाहेर गेली होती. या महिलेचे रवींद्र पवार याच्याशी प्रेमप्रकरण असल्याचा संशय पोलिसांना आहे.
- दोघांच्यात वाद कशावरून?
संशयित रवींद्र पवार हा आगाशिवनगरच्या दांगट वस्ती रस्त्यावरील पुलावर थांबला होता. याच दरम्यान कामानिमित्त बाहेर गेलेली ती महिला रस्त्याने चालत येत होती. त्या दोघांचे यापूर्वी प्रेमप्रकरण असल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले. जखमी महिलेचा यापूर्वी विवाह झाला असला तरी काही कारणाने ती आगाशिवनगर येथील दांगट वस्तीत ती माहेरी राहात होती. याच काळात या दोघांचे प्रेमप्रकरण जुळल्याचा संशय पोलीस व्यक्त करत आहेत. मात्र या दोघांच्यातील वाद नेमका काय होता? आणि तो इतक्या टोकाला का पोहोचला? याचा पोलीस रात्री उशिरापर्यंत तपास करत होते.
- कोयत्याने वार अन् रक्ताचा सडा
विवाहित महिला ही गुरूवारी दुपारी मलकापूर नगरपरिषदेच्या जलशुद्धीकरण केंद्रासमोरील पुलावरून चालत येत होती. दुपारची वेळ असल्याने घटनास्थळी वर्दळ फार नव्हती. याच दरम्यान संशयित हल्लेखोर दबा धरून बसलेला असावा. पुलाच्या चौकात त्यांच्यात काही बोलणे झाले असावे. यातूनच हल्लेखोराने अचानक कोयता काढत संबधित विवाहित महिलेच्या मानेवार, हातावर, पाठीवर वार केले. अचानक झालेल्या हल्ल्याने विवाहित महिला रस्त्यावरच कोसळली. तिचे संपूर्ण कपडे रक्ताने माखले होते. मदतीच्या प्रतिक्षेत ती रस्त्यावर टाहो फोडत होती. जिथे ती कोसळली होती, तिथे अक्षरश: रक्ताचा सडा पडला होता.
- पोलिसांची धाव…नागरिकांची मदत
संशयिताने विवाहित महिलेवर हल्ला केल्यानंतर तो पसार झाला. हा प्रकार समजताच दांगट वस्तीतील नागरिकांसह महिलांनी गर्दी केली. त्यांनी पोलिसांना फोन केला. पोलीस उपअधीक्षक अमोल ठाकूर यांनी वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजू ताशिलदार यांना हा प्रकार कळवला. गुन्हे प्रकटीकरण शाखेचे अशोक भापकर यांच्यासह त्यांचे पथक घटनास्थळी दाखल झाले. नागरिकांच्या मदतीने अत्यंत गंभीर जखमी महिलेस कृष्णा रूग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. महिलेची प्रकृती अत्यंत चिंताजनक असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले.
- हल्लेखोराच्या शोधात पोलिसांचे छापासत्र
विवाहित महिलेवर जीवघेणा हल्ला करून पसार झालेल्या संशयिताच्या मुसक्या आवळण्यासाठी कराड शहर पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेने दांगट वस्तीसह संपूर्ण आगाशिवनगर परिसरात छापासत्र सुरू केले. हा प्रकार गंभीर असल्याने त्याच्या शोधासाठी स्वत: सहाय्यक पोलीस निरीक्षक अशोक भापकर हे आगाशिवनगर परिसरात त्यांच्या पथकासह तपास करत हेते. हे प्रकरण नेमके कशामुळे घडले, याची माहिती संबधित महिलेच्या नातेवाईकांकडून माहिती काम निर्भया पथकाकडून सुरू होते.








