अथणी तालुक्यातील मलाबाद येथील घटना : पती, सासू, सासरे यांना अटक : अन्य तिघे फरार
वार्ताहर/अथणी
तालुक्यातील मलाबाद येथील प्रतिष्ठित असलेल्या व्यक्तींनी आपल्या सुनेचा अपघात दाखवून खून केल्याची घटना उघडकीस आली आहे. रेणुका संतोष होनखंडे (वय 34) असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे. याप्रकरणी पती, सासू, सासरे यांच्यासह अन्य तिघे अशा सहा जणांविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल झाला आहे. याविषयी गिरीश मल्लिकार्जुन हराळे यांनी अथणी पोलिसांत प्रकरण दाखल केले आहे. याबाबतची माहिती अशी, रेणुका हिचा विवाह मलाबाद येथील संतोष होनखंडे याच्याशी 5 वर्षांपूर्वी झाला होता. तिला मुले होत नसल्यामुळे पती आणि सासू-सासरे वारंवार त्रास देत होते.
शनिवारी रात्री तिला बेदम मारहाण करून तिचा खून करण्यात आला. त्यानंतर मोटारसायकलवरून पडून अपघातात रेणुका हिचा मृत्यू झाल्याचा बनाव करण्यात आला. याबाबत रेणुका हिच्या माहेरच्यांनी पोलिसात तक्रार दाखल केली. यानुसार पोलिसांनी तपास हाती घेतला. कसून चौकशी केली असता रेणुका हिचा खून झाल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर पोलिसांनी रेणुका हिचे सासरे कामाण्णा होनखंडे, सासू जयश्री, पती संतोष यांना अटक करून त्यांच्यावर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर अन्य तिघे संशयित फरार असून त्यांचा शोध पोलीस घेत आहेत. अतिरिक्त पोलीसप्रमुख श्वेता यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली.
खुनाच्या घटनेने खळबळ
सासरे कामाण्णा होनखंडे हे राजकीय प्रतिष्ठित व्यक्ती असून गावामध्ये अनेक प्रकारच्या समस्यांचे निराकरण करण्यासह गावात शांतता राखण्यात ते पुढे असत. असे असतानाच त्यांच्याच घरी सुनेचा खून करण्यात आल्याने खळबळ उडाली आहे. याप्रकरणी गावात उलटसुलट चर्चेला उधाण आले आहे. या प्रकरणी पोलीस अधिक तपास करीत आहेत.









