वादावादीनंतर पतीने जंगलात आवळला गळा : काकती पोलिसात गुन्हा दाखल : दोन वर्षांपूर्वी केला होता प्रेमविवाह
बेळगाव : काकती येथील एका महिलेचा गळा दाबून खून करण्यात आला आहे. भुतरामहट्टी येथील जंगल परिसरात तीन दिवसांपूर्वी ही घटना घडली असून काकती पोलीस स्थानकात खून झालेल्या महिलेच्या पतीविरुद्ध एफआयआर दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी आरोपी पतीला अटक केली आहे. पूजा सिद्धाप्पा बजंत्री (वय 21) राहणार सिद्धेश्वरनगर, काकती असे त्या दुर्दैवी महिलेचे नाव आहे. नागराज बसाप्पा निर्वाणी (वय 21) राहणार गजपती, ता. हुक्केरी याने हे कृत्य केल्याचे उघडकीस आले आहे. पोलिसांनी नागराजला अटक केली आहे. घटनेची माहिती समजताच पोलीस आयुक्त भूषण गुलाबराव बोरसे, उपायुक्त नारायण बरमणी, बेळगाव ग्रामीणचे एसीपी गंगाधर बी. एम., काकतीचे पोलीस निरीक्षक सुरेश शिंगे व त्यांच्या सहकाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली.
29 सप्टेंबर रोजी दुपारी भुतरामहट्टी येथील मुक्तीमठाजवळ जंगलात ही घटना घडली आहे. गुरुवारी मध्यरात्रीनंतर काकती पोलीस स्थानकात यासंबंधी एफआयआर दाखल केला असून पोलीस पुढील तपास करीत आहेत. नागराजने गळा आवळून पूजाचा खून केल्याचे पोलीस तपासात उघडकीस आले आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ माजली आहे. दोन वर्षांपूर्वी नागराज व पूजा यांनी एका मंदिरात प्रेमविवाह केला होता. वर्षभर पूजा नागराजच्या घरी नांदली. आठ महिन्यांपूर्वी ती माहेरी आली होती. नागराज तिला भेटण्यासाठी अधूनमधून काकतीला यायचा. 29 सप्टेंबर रोजी नागराज काकतीला आला. पूजाला त्याने आपल्यासोबत भुतरामहट्टी जंगलात नेले. या भेटीदरम्यान नागराजने पूजाला आपल्या गावी बोलावले. त्यावेळी पूजाने नागराजच्या गावी जाण्यास नकार दिला. यावेळी उभयतांमध्ये वादावादी झाली. वादावादीनंतर नागराजने पूजाचा गळा आवळल्याचे समजते. पूजाचा भाऊ सचिन बजंत्री याने नागराजविरुद्ध फिर्याद दिली आहे.









