माहेरून पैसे आण, तू आमच्या जातीची नाहीस – मानसिक छळाने विवाहितेचा अंत
इस्लामपूर : तु आमच्या जातीची नाहीस, माहेरच्या लोकांकडून दोन लाख रुपये घेवून येण्यासाठी तगादा लावल्याने तसेच शारिरीक व मानसिक छळ केल्याने अमृता ऋषिकेश गुरव (रा. अंबाबाई मंदिरा जवळ इस्लामपूर) या विवाहितेने विषारी औषध प्राशन करून आत्महत्या केली.
ही घटना शुक्रवारी सायंकाळी साडेसातच्या सुमारास घडली. या प्रकरणी अमृताची आई वंदना अनिल कोले (रेठरे हरणाक्ष) यांनी इस्लामपूर पोलीस ठाण्यात वर्दी दिली आहे.
पती ऋषिकेश अनिल गुरव, सासू अनुपमा अनिल गुरव, सासरे अनिल मधुकर गुरव, नणंद ऋतुजा पांडूरंग गुरव (सर्व रा. इस्लामपूर), पतीचे मामा नंदकिशोर पांडूरंग गुरव (रा. वडणगे जि. कोल्हापूर) या पाचजणांवर इस्लामपूर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला आहे.
अमृता हिचा २४ डिसेंबर २०२४ रोजी ऋषिकेश याच्या सोबत प्रेमविवाह झाला होता. अमृता हिचा आईशी अधून मधून संवाद व्हायचा त्यावेळी सासूच्या कॅन्सर उपचारासाठी माहेरून २ लाख रुपये आणण्यासाठी मारहाण होत असल्याचे सांगत होती. तसेच सासरा अनिल हा तुला फुकट करून आणली आहे, तुझ्या बापाने आम्हाल लग्नात काही दिले नाही, तु आमच्या जातीची नाहीस असे टोमणे मारत होता.
पती ऋषिकेश हा सतत मारहाण करत होता. तर सासू, नणंद छळ करत होते. तसेच पतीचा मामा नंदकिशोर हा ऋषिकेशाला अमृताला सोडून दे तुझं आपल्या जातीतील मुलीशी लग्न करून लावू म्हणून मानसिक त्रास देत होता. त्यामुळे अमृताने आत्महत्या केली.









