कोल्हापूर :
कौटुंबीक त्रासाला कंटाळून नवविवाहीतेने इराणी खणीमध्ये उडी मारुन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. मात्र अग्निशामक दलाच्या जवानांनी वेळीच धाव घेऊन पाण्यातून बाहेर काढल्याने ती बचावली. गुरुवारी (दि. 29) दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. अग्नीशमन दलाच्या जवानांनी त्या विवाहीतेस उपचारासाठी सिपीआर रुग्णालयात दाखल केले.
याबाबत अधिक माहिती अशी की, गुरुवारी दुपारी अडीचच्या सुमारास वीस वर्षीय विवाहिता इराणी खणीजवळ गेली. सॅक आणि चपला बाजूला ठेवून तिने पाण्यात उडी घेतली. हा प्रकार लक्षात येताच परिसरात फिरण्यासाठी गेलेल्या तरुणाने दोरी टाकून विवाहितेला वाचवण्याचा प्रयत्न केला. याचवेळी काही नागरिकांनी अग्निशामक दलास कळवले. तातडीने पोहोचलेल्या अग्निशामक दलाच्या जवानांनी विवाहितेला पाण्यातून बाहेर काढले. दरम्यान, पोटात पाणी गेल्याने विवाहिता बेशुद्ध पडली होती. अग्नीशमनच्या वाहनामध्ये प्राथमिक उपचार करुन त्या विवाहीतेस पुढील उपचारासाठी सीपीआरमध्ये दाखल करण्यात आले. दरम्यान या घटनेची माहिती मिळताच जुना राजवाडा पोलिस सिपीआर रुग्णालयात दाखल झाले. विवाहीता शुद्धिवर येताच तिच्याकडून आत्महत्येचे कारण जाणून घेण्याचा प्रयत्न पोलिसांनी केला. यावेळी तिने आपले 1 वर्षापूर्वी बालिंगा येथील एका तरुणाशी लग्न झाले आहे. माहेर जुना बुधवार पेठेतील तोरस्कर चौकातील असल्याचे सांगितले. कौटुंबिक वादातून तिने आत्महत्येचा प्रयत्न केल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. दरम्यान या प्रकरणी संबंधीतांवर करवीर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम रात्री उशिरा पर्यंत सुरु होते.








