सध्या प्रदूषणाच्या समस्येने जगभरात थैमान घातले आहे. माणसाच्या संपत्तीच्या हव्यासापोटी उद्योगांची निरंकुश वाढ होत आहे. परिणामी, औद्योगिक कचऱ्याचे प्रमाणही हाताबाहेर गेले असून हा कचरा किंवा ही टाकाऊ द्रव्ये कित्येकदा कोणतीही प्रक्रिया न करता वाहत्या पाण्यात सोडली जातात. त्यामुळे जगभरातील नद्या, सरोवरे, नाले आणि ओढे प्रदूषित झाले आहेत. युरोपातही ही समस्या गंभीर असून अनेक नद्यांचे दूषित पाण्याने वाहणारे नाले झालेले आहेत.
निसर्गाची मानवाने चालविलेलीं ही दुर्दशा पाहून व्यथित झालेल्या मेगन ट्रंप नामक एका महिलेने अशाच एका नाल्याशी विवाह करुन जनजागृती करण्याचा प्रयत्न चालविला आहे. या विवाहासाठी तिने आपल्या सर्व नातेवाईकांना आणि मित्रमैत्रिणींना आमंत्रित केले होते. ते सर्वजण आवर्जून उपस्थितही होते. तथापि, ज्या नाल्याशी लग्न केले जात होते तो इतक्या दुर्गंधीने भरलेला होता की, वऱ्हाडी मंडळींना अक्षरश: नाक मुठीत धरुनच विवाह समारंभ उरकला.
मानवाने अतिशय क्रूरपणे निसर्गावर अत्याचार चालविला असून त्याच्याकडे जगाचे लक्ष वेधावे म्हणून हा अनोखा विवाह आपण केला, असे मेगन यांनी स्पष्ट केले. प्रदूषण असेच वाढत राहिले, तर एक दिवस सर्वांनाच ते ग्रासून टाकणार असून मानवतेची सुटका करायची असेल तर ही प्रक्रिया रोखली पाहिजे, हा संदेश देण्यासाठीच हा विचित्र वाटणारा विवाह करण्यात आला असे त्या म्हणतात.









