एखाद्याचा विवाह होणार असेल आणि त्यापूर्वीच तो एखाद्या दुर्घटनेला सामोरा गेल्यास घरात कशाप्रकारचे वातावरण असेल याचा विचार करा. काहीशी अशीच घटना एका व्यक्तीसोबत घडली. विवाह तोंडावर असताना या व्यक्तीचे शरीर सुमारे 32 टक्के भाजले. कुठल्यातरी रसायनामुळे शरीर होरपळल्याने हा व्यक्ती रुग्णालयात दाखल होता. अशा स्थितीत त्याच्या नियोजित वधूने रुग्णालयात जात विवाह करण्याचा निर्णय घेतला. एक वर मार्मिक सोहळ्यात जॉर्जिया रुग्णालयाच्या बर्न युनिटमध्ये स्वत:च्या वधूसोबत विवाहबंधनात अडकला आहे.
प्रेस्टन कॉबने यापूर्वी इराक युद्धात भाग घेतला होता. मागील वर्षी सप्टेंबरमध्ये साखरपुडा केल्यावर 22 जुलै रोजी तो तनेशासोबत विवाह करणार होता. परंतु तत्पूर्वीच 30 जून रोजी कामादरम्यान रसायनाच्या गळतीमुळे तो जखमी झाला. यामुळे त्याचे 32 टक्के शरीर होरपळले होते. या दुर्घटनेत माझा अंत होणार असल्याचे वाटत होते असे प्रेस्टनने सांगितले आहे.
आयसीयूमध्ये केला विवाह

प्रेस्टन जखमी झाल्याने त्याला रुग्णालयातील बर्न युनिटमध्ये दाखल करण्यात आले होते. या दुर्घटनेमुळे प्रेस्टनला स्वत:च्या पायांची 9 बोटं गमवावी लागली आहेत. तसेच त्याच्या उजव्या हाताची 4 बोटं डॉक्टरांना कापावी लागली आहेत. तर डाव्या हाताच्या 4 बोटांना आंशिक स्वरुपात हटवावे लागले आहे. अशा स्थितीत तनेशा आपल्यासोबत विवाह करणार नाही अशी भीती प्रेस्टनला सतावत होती. परंतु त्याची भीती खोटी ठरवत तनेशाने त्याची प्रतीक्षा करण्याचा निर्णय घेतला. प्रेस्टनची प्रकृती काही प्रमाणात सुधारल्यावर निश्चित दिनी स्वत:चे कुटुंबीय, मित्र अन् नर्सेसच्या गर्दीत प्रेस्टन अन् तनेशाने अत्यंत हृदयस्पर्शी सोहळ्यात विवाह केला आहे.









