प्रियकर ऍन्ड्रय़ू फोर्मसोबत नात्यात
हॉलिवूड अभिनेत्री अलेक्झांड्रा डॅडारियाने न्यू ऑरलियन्समध्ये स्वतःचा प्रियकर तसेच चित्रपटनिर्माता ऍन्ड्रय़ू फोर्मसोबत विवाह केला आहे. त्यांच्या या विवाहसोहळय़ासाठी ‘व्हिंटेज थीम’ तयार करण्यात आली होती. ‘बेवॉच’च्या अभिनेत्रीने स्वतःच्या इन्स्टाग्रामवर सोहळय़ातील छायाचित्रे शेअर केली आहेत.

छायाचित्रांमध्ये नवदांपत्य दिसून येते. अलेक्झांड्राने एक लांब प्लीटेड ड्रेस आणि ट्रेलिंग टय़ूल वेइल परिधान केला होता. हा पोशाख डिझायनर डॅनियल प्रँकल यांनी तयार केला होता. तर ‘ए सायलेंट प्लेस’च्या निर्मात्याने स्वतःच्या विवाहात डिझायनर ब्रुनेलो क्यूकिनेली यांच्याकडून निर्मित पिनस्ट्रिप सूट परिधान केला होता. डॅडारियोची बेवॉचमधील सह-कलाकार प्रियांका चोप्राने नवदांपत्याला शुभेच्छा दिल्या आहेत.
‘हॉल पास’ची नायिका असणाऱया अलेक्झांड्राने 2021 मध्ये ऍन्ड्रय़ू फोर्मला डेट करणे सुरु केले होते. या जोडप्याने ऑगस्ट 2021 मध्ये एंगेजमेंट केली होती. ऍन्ड्रय़ूने विवाहाच्या 15 वर्षांनी जून 2021 मध्ये स्वतःची पहिली पत्नी जोर्डाना ब्रूस्टरकडून घटस्फोट घेतला होता.









