ऑनलाईन टीम / तरुण भारत :
पुण्यातील दोन शेतकरी तरुणांशी विवाह करुन सोने-चांदीच्या दागिन्यांसह रोख रक्कम घेऊन पसार होणाऱ्या बनावट नवरीसह सात टोळीला नारायणगाव पोलिसांनी अटक केली आहे. जयश्री नामक या बनावट नवरीने दीड वर्षात तब्बल 20 तरुणांशी विवाह करुन त्यांची फसवणूक केल्याचे तपासात समोर आले आहे. या टोळीला 7 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.
बनावट नवरी जयश्री काळू घोटाळे (वय 35, रा. मुरंबी शिरजगाव, नाशिक), बनावट मावशी मीरा बंसी विसलकर (39), तुकाराम भाऊराव मांगते (23, दोघेही रा. अंबुजावाडी, नाशिक), एजंट शिवाजी शंकर कुरकुटे (64 रा. कुरकुटेवाडी, बोटा), बाळू भिकाजी काळे (46, रा. बोटा जि. नगर), बाळू गुलाब सरवदे (41, रा. गुंजाळवाडी, ता. जुन्नर) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपेंची नावे आहेत.
शेतकरी कुटुंबातील मुलांची वेळेत लग्न होत नसल्याच्या गोष्टीचा फायदा घेत बनावट नवरी, मावशी आणि नातेवाईक अशी सात जणांची टोळी तयार झाली होती. या मधील बनावट नवरीने मध्यस्थी मार्फत मागील दोन महिन्यात जुन्नर तालुक्यातील 4, संगमनेर तालुक्मयातील 2, अशा सहा जणांची तर मागील दीड वर्षात पुणे, नगर आणि नाशिक जिल्ह्यातील एकूण 20 तरुणांशी विवाह करून लाखो रुपयांची आर्थिक फसवणूक केली आहे. समाजात प्रतिष्ठा जाऊ नये म्हणून हे तरुण तक्रार देण्यास तयार होत नव्हते. त्यामुळे या टोळीचा हा धंदा सुरू होता. मात्र, नारायणगाव पोलीस ठाण्यात यासंदर्भातील तक्रार येताच या टोळीला जेरबंद करण्यात आल्याचे सहायक पोलीस निरीक्षक पृथ्वीराज ताटे व तपासी अधिकारी व्ही. व्ही. ध्रुवे यांनी सांगितले.