कायदामंत्री निलेश काब्राल यांची घोषणा : नोंदणी खात्यातर्फे नोंदणी दिवस साजरा
प्रतिनिधी /पणजी
विवाह नोंदणी सारख्या कामांसाठी यापुढे लोकांना नोंदणी कार्यालयात येण्याची आवश्यकता भासणार नाही. लवकरच अशा अनेक नोंदणी प्रक्रिया क्विक रिस्पॉन्स अर्थात ’क्यूआर’ कोडच्या माध्यमातून करण्यात येतील, अशी घोषणा कायदामंत्री निलेश काब्राल यांनी केली.
नोंदणी कार्यालयातर्फे आयोजित नोंदणी दिवस -2022 कार्यक्रमात ते बोलत होते. पाटो येथील कला संस्कृती खात्याच्या सभागृहात आयोजित या कार्यक्रमास त्यावेळी निबंधक आषुतोष आपटे, जिल्हा सहनिबंधक यांच्यासह विविध तालुक्यांचे उपनिबंधक आणि कर्मचारी त्यावेळी उपस्थित होते.
लोकांना या कार्यालयाशी संबंधित आपली कामे घरबसल्या करता यावी व त्यायोगे कार्यालयातील गर्दी कमी व्हावी तसेच सरकार अधिकाधिक लोकाभिमूख बनवावे या दृष्टीने गेल्या चार वर्षांपासून प्रयत्न चालू होते. हे सर्व घडण्यासाठी कागदोपत्री प्रक्रिया सोपी होणे तसेच सर्वांचे सहकार्य अपेक्षित होते. त्यावर उपाय म्हणून क्यूआर कोडची कल्पना पुढे आली असून येत्या काही दिवसात ही सर्व कामे टप्प्याटप्प्याने करण्यात येतील.
लवकरच ई-नोटरायझेशन
ई-नोटरायझेशन अर्थात ईलेक्ट्रॉनिक माध्यमातून राज्यातील सर्व नोटरीना एका प्लॅटफॉर्मखाली आणण्यात येतील. त्याशिवाय जमिनीशी संबंधित उतारे, नील इन्कुम्बरन्स प्रमाणपत्र, सोसायटय़ांचे परवाना नुतनीकरण यासारखे दस्तावेजही ईलेक्ट्रॉनिक माध्यमातून देण्याची व्यवस्था प्रत्येक तालुक्यात करण्याची योजना आहे, अशी माहिती मंत्री काब्राल यांनी दिली.









