सध्या आयफोन 17 चे जोरदार वेड अनेकांना लागले आहे. आज बाजारात या प्रकारच्या आयफोनच्या दोन व्हर्शन्स उपलब्ध आहेत. भगव्या किंवा केशरी रंगातील आयफोनही ग्राहकांच्या सेवेसाठी सज्ज आहे. या भगव्या रंगातील आयफोने तर धूम निर्माण केली आहे. भगव्या रंगातील आयफोन 17 मॅक्स घेण्यासाठी ग्राहकांमध्ये अक्षरश: स्पर्धा लागली असून काही विक्रीकेंद्रांवर तर या फोनसाठी ग्राहकांमध्ये मारामाऱ्या झाल्याची वृत्ते झळकली आहेत. कर्ज काढून सण साजरे करु नयेत असे म्हणतात. पण लोक आयफोन 17 च्या इतके प्रेमात पडले आहेत, की जवळ पुरेसे पैसे नसतानाही कर्ज काढून तो घेतला जात आहे आणि नंतर कर्जफेडीसाठी मासिक हप्ते भरले जात आहेत. इतके टोकाचे हे वेड आहे.
सध्या सोशल मिडियावर याच संदर्भातला एक व्हिडीओ प्रसारित केला जात आहे. या व्हिडीओत एक युवक भगव्या रंगाच्या आयफोन 17 शी विवाह करुन त्याला नववधूच्या थाटात आपल्या घरात घेऊन आलेला दिसत आहे. अगदी पारंपरिक थाटामाटात या मोबाईलचा ‘गृहप्रवेश’ करण्यात आल्याचेही दिसत आहे. गृहप्रवेश करताना माप ओलांडच्याची पद्धत असते. तशाच प्रकारे आयफोनचा स्पर्ष करुन धान्याने भरलेले माप या मोबाईलकडून ओलांडून घेण्यात आल्याचेही दिसून येत आहे. यावेळी पॅडमॅन या चित्रपटातील ‘आज से तेरी सारी दुनिया मेरी हो गयी’ हे लोकप्रिय गाणेही लावण्यात आले आहे. अशा प्रकारे सर्व परंपरा आणि रितींचे पालन करुन या भगव्या रंगाच्या आयफोन 17 ला घरात आणले जाते.
इथपर्यंत एकवेळ ठीक आहे. तथापि, नंतर जे घडते, ते आश्चर्याचा धक्का देणारेच आहे. या मोबाईला घरात आणल्यानंतर, एक घटस्फोटाची नोटीस त्याला देण्यात येते आणि त्याच्याशी घटस्फोट घेतला जातो. अशा प्रकारे विवाह आणि वधूच्या गृहप्रवेशानंतर त्वरित घटस्फोटही होतो. सध्या हा व्हिडीओ लोकप्रिय होत असून तो लक्षावधी लोकांनी पाहिला आहे. त्यावर विविध प्रकारच्या विनोदी तसेच उपहासात्मक प्रतिक्रियाही व्यक्त होत आहेत. आपल्या खऱ्या पत्नीला विकून ही मोबाईलरुपी पत्नी आणली आहे का, असा खोचक प्रश्न एका दर्शकाने विचारला आहे. एकंतर या मोबाईलने जनमानसाचा चांगलाच ठाव घेतल्याचे दिसत आहे.









