ट्रम्प यांच्या इशाऱ्याने औषध, वाहन कंपन्यांचे समभाग नुकसानीत
वृत्तसंस्था/ मुंबई
चालू आठवड्यातील दुसऱ्या सत्रात मंगळवारी जागतिक बाजारपेठेत तेजी असूनही भारतीय शेअर बाजार घसरणीसह बंद झाले. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावर अतिरिक्त कर लादण्याच्या धमकीमुळे औषध आणि वाहन कंपन्यांच्या शेअर्समध्ये विक्री झाली. यामुळे बाजार घसरणीसह बंद झाला आहे.
बीएसई सेन्सेक्स 80,946.43 वर उघडला. अखेरच्या क्षणी सेन्सेक्स 308 अंकांनी घसरून 80,710 वर बंद झाला. निफ्टी 73 अंकांनी घसरून 24,649.55 वर बंद झाला. सेन्सेक्स कंपन्यांमध्ये अदानी पोर्ट्स, रिलायन्स इंडस्ट्रीज, इन्फोसिस, आयसीआयसीआय बँक, इटरनल, भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड आणि एचडीएफसी बँक घसरणीसह बंद झाले. दुसरीकडे, टायटन, मारुती, ट्रेंट लिमिटेड, भारती एअरटेल, बजाज फायनान्स, टेक महिंद्रा, एसबीआय हे प्रमुख वाढलेले शेअर्स होते. व्यापक बाजारपेठेतही घसरण नोंदवण्यात आली. निफ्टी मिडकॅप 100 निर्देशांक 0.39 टक्के आणि स्मॉलकॅप निर्देशांक 0.16 टक्के घसरून बंद झाला.
काही क्षेत्रांमध्ये संमिश्र कामगिरी
क्षेत्रीय आघाडीवर संमिश्र कामगिरी दिसून आली. निफ्टी ऑटो निर्देशांक 0.37 टक्के, धातू निर्देशांक 0.09 टक्के आणि ग्राहक टिकाऊ वस्तू निर्देशांक 0.12 टक्के वाढून बंद झाला. निफ्टी ऑइल अँड गॅस निर्देशांकही सर्वाधिक घसरणीत होता. औषध निर्देशांक 0.83 टक्के आणि एफएमसीजी निर्देशांकात 0.72 टक्क्यांनी घट झाली.
आयात शुल्क वाढवण्याची धमकी
अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सोमवारी भारतावर अतिरिक्त आयात शुल्क लादण्याची धमकी दिली. त्यांनी सांगितले की रशियाकडून तेल खरेदी केल्यामुळे भारतातून येणाऱ्या वस्तूंवर आयात शुल्कात मोठी वाढ होईल. तर भारताने म्हटले आहे की ते आपल्या हितांचे रक्षण करण्यासाठी पावले उचलेल.









