सेन्सेक्स 319 अंकांनी तेजीत : मेटल, फार्मा निर्देशांकही चमकले
वृत्तसंस्था/ मुंबई
आयटी समभागांच्या मजबूत कामगिरीच्या पार्श्वभूमीवर भारतीय शेअर बाजार सोमवारी आठवड्याच्या पहिल्या दिवशी चांगल्या तेजीसमवेत बंद झाला. सेन्सेक्स 319 अंकांनी तेजी समवेत बंद होण्यात यशस्वी झाला. सोमवारी मेटल आणि फार्मा समभागांमध्ये सुद्धा खरेदी दिसून आली. यांनीच बाजाराला तेजी राखण्यामध्ये मदत केली.
सोमवारी सरतेशेवटी मुंबई शेअर बाजाराचा 30 समभागांचा सेन्सेक्स निर्देशांक 319 अंकांनी वाढत 83,535 अंकांवर बंद झाला तर दुसरीकडे राष्ट्रीय शेअर बाजाराचा 50 समभागांचा निफ्टी निर्देशांक 82 अंकांनी वाढत 25,574 अंकांवर बंद झाला. जागतिक बाजारामध्ये मिळताजुळता कल राहिला होता.
सकाळच्या सत्रामध्ये मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स निर्देशांक हलक्या घसरणीसह 83,198 अंकांवर खुला झाला होता तर निफ्टी 25,503 या स्तरावर खुला झाला होता. सेन्सेक्समध्ये पाहता इन्फोसिस, एचसीएल टेक, बजाज फायनान्स, एशियन पेंट्स, टाटा मोटर्स पीव्ही आणि टीसीएस यांचे समभाग तेजीत राहिले होते तर भारतीय स्टेट बँकेचे समभाग मात्र मोठ्या घसरणीसह बंद झाले. निफ्टी मिडकॅप निर्देशांक 0.47 टक्के आणि निफ्टी स्मॉल कॅप निर्देशांक 0.35 टक्के वाढीसोबत बंद झाले. विविध क्षेत्रांच्या निर्देशांकाची कामगिरी पाहता आयटी निर्देशांक 1.62 टक्के वाढत बंद झाला. फार्मा निर्देशांक 0.95 टक्के वाढीसोबत बंद झाला तर याशिवाय निफ्टी ऑटो, एनर्जी, मेटल, कंझ्युमर ड्युरेबल, ऑइल अँड गॅस आणि हेल्थकेअर यांचे निर्देशांक सुद्धा तेजी दाखवत बंद झाला. निफ्टी मीडिया निर्देशांक मात्र 1.04 टक्के घसरणीत होता. पीएसयु बँक, एफएमसीजी, रियल्टी आणि केमिकल यांचे निर्देशांक घसरणीत राहिले होते.
जागतिक बाजारांच्या कामगिरीवर नजर फिरवली असता आशियाई बाजारात तेजी दिसून आली. जपानचा निक्केई-225 निर्देशांक 0.9 टक्के वाढला होता. दक्षिण कोरियाचा कोस्पी निर्देशांक 2.5 टक्के इतका वाढत व्यवहार करत होता तर हाँगकाँगचा हँगसेंग निर्देशांक 0.33 टक्के वाढला होता. शुक्रवारी अमेरिकेतील बाजार तेजीसमवेत बंद झाले होते. एस अँड पी-500 निर्देशांक 0.13 टक्के तर डोव्ह जोन्स 0.16 टक्के वाढत बंद झाला. नॅसडॅक मात्र 0.21 टक्के घसरलेला होता.









