सेन्सेक्स 270 तर निफ्टी 61 अंकांनी तेजीत
वृत्तसंस्था/ मुंबई
चालू आठवड्यातील मंगळवारच्या सत्रात आशियाई बाजारातील तेजीच्या पार्श्वभूमीवर भारतीय शेअर बाजार तेजीसह बंद झाला. अमेरिका आणि भारतात लवकरच ‘मिनी ट्रेड डील’ होणार असल्याच्या वृत्तामुळे शेवटच्या तासांमध्ये बाजारात हालचाल दिसून आली. तथापि, अमेरिकेच्या व्यापार धोरणांवरील अनिश्चिततेमुळे गुंतवणूकदार सावध राहिले. याशिवाय, वित्तीय शेअर्समधील खरेदीनेही बाजाराला चालना दिली.
मुख्य कंपन्यांच्या मदतीने बीएसई सेन्सेक्स सकाळी 50 अंकांपेक्षा जास्त घसरून 83,387.03 वर खुला झाला. ट्रेडिंग दरम्यान चढ-उतार दिसून आला. अंतिम सत्रात बीएसई सेन्सेक्स 270.01 अंकांनी वधारुन निर्देशांक 0.32 टक्क्यांनी वाढून 83,712.51 वर बंद झाला. दुसऱ्या बाजूला, राष्ट्रीय शेअर बाजार (एनएसई) चा निफ्टी 61.20 अंकांनी वाढून 25,522.50 वर बंद झाला.मंगळवारी निफ्टी रिअल्टी निर्देशांक जवळजवळ 1 टक्क्यांनी वाढला. ब्रिगेड एंटरप्राइज, प्रेस्टिज इस्टेट, डीएलएफ, अनंत राज, फिनिक्स मिल्स सारखे रिअल्टी शेअर्स वधारले. याशिवाय, निफ्टी बँक, फायनान्शियल सर्व्हिसेस, आयटी आणि एनर्जी यांसारख्या क्षेत्रातील कंपन्यांचे समभाग वाढलेले दिसले.
ट्रम्प यांनी 14 देशांवर कर लादले
1 ऑगस्टपासून जपान, दक्षिण कोरिया, मलेशिया, कझाकस्तान आणि ट्युनिशिया येथून अमेरिकेत निर्यात होणाऱ्या वस्तूंवर 25 टक्के कर आकारला जाईल. याशिवाय, इंडोनेशियाला 32 टक्के, बांगलादेशला 35 टक्के आणि कंबोडिया आणि थायलंडला 36 टक्के कर आकारला जाईल. दुसरीकडे, लाओस आणि म्यानमारला अमेरिकेत निर्यात होणाऱ्या वस्तूंवर 40 टक्के कर आकारला जाईल. आशियाई क्षेत्राबाहेर, ट्रम्पने दक्षिण आफ्रिकन आणि बोस्नियन वस्तूंवर 30 टक्के कर लादण्याची घोषणा केली आहे.
ट्रम्प यांनी नवीन कर जाहीर केल्यानंतर डाऊ जोन्स इंडस्ट्रियल सरासरी 0.94 टक्क्यांनी घसरला. एस अँड पी-500 0.79 टक्क्यांनी घसरला.









