खरेदीसाठी गर्दी ः पोहे, शेंगा, फुटाणे, लाहय़ांना मागणी
प्रतिनिधी/ बेळगाव
नागपंचमी अवघ्या दोन दिवसांवर येऊन ठेपल्याने नागपंचमीसाठी लागणाऱया साहित्याच्या खरेदीसाठी बाजारात शनिवारी गर्दी झाली होती. नागपंचमी, श्रावण मास या पार्श्वभूमीवर बाजारपेठदेखील बहरली होती. त्यामुळे खरेदीसाठी नागरिकांची रेलचेल दिसून आली. विशेषतः फराळासाठी गर्दी झाली होती. चिवडय़ाचे पोहे, रवा, शेंगदाणे, गूळ, खोबरे, फुटाणे, लाहय़ा आदींची खरेदी जोमाने सुरू आहे.

नागपंचमीला नागमूर्ती पुजण्याची प्रथा आहे. त्यामुळे गणपत गल्लीत विक्रीसाठी दाखल झालेल्या रंगीबेरंगी मूर्तींना मागणी वाढली होती. 20 रुपयांपासून 80 रुपयांपर्यंत किमती होत्या. आजही शहरासह ग्रामीण भागात पोहय़ाचे लाडू बनविण्याची पद्धत रूढ आहे. त्यामुळे पोहे, शेंगा, गूळ यांना पसंती अधिक होती. नागपंचमीसाठी लागणाऱया फराळय़ाच्या साहित्य खरेदीसाठी गर्दी झाली होती. चिवडय़ाचे पोहे 60 ते 65 रुपये किलो, भाजलेल्या शेंगा 140 रुपये किलो, लाहय़ा 10 रुपये लिटर, चिरमुरे 60 रुपये किलो, फुटाणे 80 ते 100 रुपये किलो, चक्की गूळ 50 रुपये किलो, गूळ 45 रुपये असा दर आहे.
श्रावणातील पहिलाच सण नागपंचमी असल्याने विशेषतः महिलावर्गामध्ये उत्साहाचे वातावरण आहे. गत दोन वर्षांत कोरोनामुळे निर्बंध आले होते. मात्र यंदा सण उत्साहात साजरे होत आहेत. त्यामुळे नागपंचमीच्या खरेदीसाठी बाजारात उधाण आल्याचे दिसत आहे.
फळांनाही मागणी
श्रावणमासाला सुरुवात झाल्यामुळे बाजारात विविध फळांनादेखील मागणी वाढली आहे. सफरचंद 100 ते 240 रु. किलो, पेरू 80 ते 100 रु. किलो, डाळिंब 60 ते 160 रु. किलो, संत्री 280 रु. किलो, पपई 20 ते 60 रु. नग, मोसंबी 60 ते 80 रु. किलो, वेलची केळी 90 रु. किलो, जवारी केळी 50 ते 70 रु. किलो, अननस 40 ते 60 रु. नग, तोतापुरी आंबा 100 ते 140 रुपये एक याप्रमाणे दर आहे. श्रावण महिन्यात दर गुरुवारी व शुक्रवारी पुजेसाठी फळांची मागणी वाढणार आहे.
खाद्यतेलांच्या दरात घट
मागील आठ दिवसांत खाद्यतेलांच्या किमतीत काहीशी घट झाली आहे. शेंगा तेल 190 रु. किलो, सोयाबिन 150 रुपये किलो, पामतेल एक लिटर पाकीट 125 रु. असा दर झाला आहे. मागील काही दिवसांपासून खाद्यतेलांच्या किमती भरमसाट वाढल्या होत्या. त्यामुळे सर्वसामान्यांना तेल खरेदी करणे अडचणीचे बनले होते. आता काही प्रमाणात तेलांच्या किमती कमी झाल्याने सर्वसामान्य जनतेला दिलासा मिळाला आहे.









