सेन्सेक्स 250 अंकांनी नुकसानीत ः आयटी कंपन्या घसरणीत
वृत्तसंस्था/ मुंबई
भारतातील महागाईचे आकडे लवकरच सादर होणार असून या पार्श्वभूमीवर गुंतवणुकदारांनी बाजारात सावधगिरीची भूमिका बजावल्याने भारतीय शेअरबाजार आठवडय़ाच्या पहिल्या दिवशी काहीसा घसरणीसह बंद झाला. एसबीआय बँकेसह माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील कंपन्यांचे समभाग नुकसानीत पाहायला मिळाले.
सोमवारी सरतेशेवटी मुंबई शेअरबाजाराचा 30 समभागांचा सेन्सेक्स निर्देशांक 250 अंकांनी म्हणजेच 0.41 टक्के घसरत 60431.84 अंकांवर तर राष्ट्रीय शेअरबाजाराचा निफ्टी निर्देशांक 85 अंकांनी घसरत (0.48 टक्के) 17770.90 अंकांवर बंद झाला होता. भारतातील आणि अमेरिकेतील महागाईचे आकडे आगामी काळात जाहीर होणार आहेत. या पार्श्वभूमीवर गुंतवणूकदार थोडेसे सावध झालेले आहेत, असे एकंदरीत बाजारातील मूड पाहिल्यावर लक्षात येत आहे. निफ्टी निर्देशांकाने दिवसभरात 17720 अंकांची निच्चांकी पातळी गाठली होती तर सेन्सेक्स निर्देशांकाने 60245 ची निच्चांकी गाठली होती. जागतिक बाजारामध्ये बरेचसे बाजार घसरणीत होते. त्यामुळे त्याचेही परिणाम सोमवारी भारतीय शेअरबाजारात दिसले.
सार्वजनिक बँकांचा निर्देशांक आणि आयटी क्षेत्रातील कंपन्या नकारात्मक कामगिरी करत होत्या. अदानी समूहातील विविध कंपन्यांचे समभाग घसरणीत होते. मुडी यांनी कंपनीच्या महसुलाबाबत कपातीचे संकेत व्यक्त केले होते. अदानी एंटरप्रायझेसचा समभाग 7 टक्के, अदानी पोर्ट्सचा समभाग 5 टक्के आणि अदानी ग्रिन एनर्जी, अदानी ट्रान्समिशन, अदानी टोटल गॅस, अदानी विल्मर आणि अदानी पॉवर यांचे समभाग प्रत्येकी 5 टक्के घसरणीत होते.
स्टेट बँक ऑफ इंडिया, इन्फोसिस आणि टीसीएस या कंपन्यांचे समभाग मोठय़ा प्रमाणात नुकसानीत होते. दुसरीकडे टायटन, एनटीपीसी, लार्सन अँड टुब्रो, बजाज ऑटो, आयशर मोटर्स यांचे समभाग मात्र तेजीसह बंद झाले होते.









