सेन्सेक्स 174 तर निफ्टी 58 अंकांनी नुकसानीत
वृत्तसंस्था/ मुंबई
चालू आवठड्यातील पहिल्या दिवशी सोमवारी जागतिक बाजारातील नकारात्मक संकेतांमुळे पहिल्या व्यापार सत्रात भारतीय शेअरबाजार घसरणीसह बंद झाला. 1 नोव्हेंबरपासून चीनवर अतिरिक्त 100 टक्के कर लादण्याच्या ट्रम्पच्या घोषणेमुळे जागतिक बाजारपेठेत घसरण झाली. त्याचा परिणाम देशांतर्गत बाजारपेठांवरही दिसून आला. बीएसई सेन्सेक्स 400 अंकांपेक्षा जास्त घसरणीसह 82,049.16 वर उघडला. खुला होताच चढ-उतार पाहायला मिळाले. अखेर 173.77 अंकांनी घसरून 82,327.05 वर बंद झाला. त्याचप्रमाणे, राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी 58.00 अंकांनी घसरून 25,227.35 वर बंद झाला.
सेन्सेक्स कंपन्यांमध्ये टाटा मोटर्स, इन्फोसिस, हिंदुस्थान युनिलिव्हर, पॉवर ग्रिड, आयटीसी आणि भारत इलेक्ट्रॉनिक्स हे सर्वाधिक घसरणीत राहिले तर अदानी पोर्टस आणि अॅक्सिस बँक हे सर्वाधिक तेजीत राहिले. निफ्टी आयटी आणि एफएमसीजी हे सर्वात जास्त प्रभावीत राहिले. यामध्ये अनुक्रमे 0.78 टक्के आणि 0.9 टक्के घसरण नोंदवली गेली. दुसरीकडे, निफ्टी फायनान्शियल सर्व्हिसेस 0.35 टक्के वाढले. व्यापक बाजारातील चर्चेत, निफ्टी मिडकॅप 100 0.11 टक्क्यांनी वधारला, तर निफ्टी स्मॉलकॅप 100 निर्देशांक 0.17 टक्क्यांनी घसरला.
ट्रम्पच्या निर्णयाचा जागतिक बाजारावर परिणाम
ट्रम्पने घोषणा केली की 1 नोव्हेंबरपासून चीनवर अतिरिक्त 100 टक्के कर लादला जाईल. चीनच्या सर्व उत्पादनांवर व्यापक निर्यात बंदी घालण्याची तयारी करत असल्याने हा निर्णय घेण्यात आला. त्यांनी याला आंतरराष्ट्रीय व्यापाराचा ‘नैतिक अपमान’ म्हटले. ट्रम्प म्हणाले की चीनने आंतरराष्ट्रीय समुदायाला एक प्रतिकूल पत्र पाठवले आहे आणि जवळजवळ सर्व उत्पादनांवर व्यापक निर्यात नियंत्रणे जाहीर केली आहेत. त्यांनी याला आंतरराष्ट्रीय व्यापारात ‘अभूतपूर्व’ आणि दीर्घ नियोजित रणनीती म्हटले आहे.









