सेन्सेक्स-निफ्टी प्रभावित ः दिग्गज कंपन्यांच्या समभागात घसरण
वृत्तसंस्था/ मुंबई
चालू आठवडय़ातील दुसऱया दिवशी मंगळवारच्या सत्रात भारतीय भांडवली बाजारात घसरणीचे वातावरण राहिल्याचे दिसून आले. जागतिक पातळीवरील नकारात्मक संकेतांमुळे भारतीय बाजार नुकसानीत राहिले. मंगळवारी प्रारंभीच्या काळात प्राप्त केलेली तेजी ही अंतिम क्षणी गमावत बाजार बंद झाला आहे. दिग्गज कंपन्यांमध्ये रिलायन्स इंडस्ट्रीज आणि टीसीएस समभागातही घसरणीचा कल राहिला.
बीएसईमध्ये अंतिमक्षणी 103.90 अंकांच्या घसरणीसह निर्देशांक 61,702.29 वर बंद झाला. दुसऱया बाजूला राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी 35.15 अंकांनी प्रभावित होत निर्देशांक 18,385.30 वर बंद झाला आहे. दिवसभरातील व्यवहारांमध्ये सेन्सेक्स तब्बल 703.51 अंकांनी गडगडल्याची नेंद करण्यात आली, मात्र काहीवेळ खरेदी झाल्याने नुकसानीतून भरपाई झाली.
टाटा मोर्ट्स, हिंदुस्थान युनिलिव्हर, महिंद्रा ऍण्ड महिंद्रा, लार्सन ऍण्ड टुब्रो, भारती एअरटेल, मारुती सुझुकी, एनटीपीसी, टेक महिंद्रा, बजाज फायनान्स आणि टाटा स्टील यांचे समभाग घसरणीसह बंद झाले आहेत. अन्य कंपन्यांमध्ये अल्ट्राटेक सिमेंट, इंडसइंड बँक ऍक्सिस बँक आणि आयसीआयसीआय बँक यांचे समभाग वधारत बंद झाले.
आशियातील अन्य बाजारांमध्ये दक्षिण कोरियाचा कॉस्पी, जपानचा निक्की, चीनच शांघाय कम्पोजिट आणि हाँगकाँगचा हँगसेंग हे नुकसानीसह बंद झाले. युरोपातील बाजार दुपारच्या सत्रात घसरणीसोबत कार्यरत राहिला होता. याच दरम्यान आंतरराष्ट्रीय तेल मानक बेंट क्रूड 0.65 टक्क्यांनी वाढून तो 80.32 डॉलर प्रति बॅरेलवर राहिले आहे.
जागतिक पातळीवर विविध संस्थांत्मक गुंतवणूकदारांनी भारतीय बाजारातून विक्री सुरु केली असल्यामुळे त्याचा प्रभाव भांडवली बाजारावर होत गेला आहे. विदेशी गुंतवणूकदारांनी सोमवारच्या सत्रात जवळपास 538.10 कोटी रुपये इतक्या किमतीच्या समभागांची विक्री केली आहे.









