सेन्सेक्स 152 अंकांनी तर निफ्टी 45 अंकांनी नुकसानीत
वृत्तसंस्था/ मुंबई
भारतीय भांडवली बाजारात चालू आठवडय़ातील बुधवारच्या सत्रात बीएसई व एनएसई यांचे निर्देशांक नुकसानीसह बंद झाले आहेत. यामध्ये जागतिक पातळीवरील बाजारांमध्ये नकारात्मक स्थितीसह वीज, धातू आणि टिकाऊ साहित्य निर्मिती करणाऱया कंपन्यांच्या समभागांमध्ये विक्रीचा प्रवास राहिल्याच्या कारणास्तव दोन्ही बाजारात घसरणीचे सत्र राहिल्याचे दिसून आले.
जागतिक पातळीवरील प्रभावामध्ये डॉलरच्या तुलनेत रुपयांमध्ये तेजी आणि विदेशी भांडवली प्रवाह कायम राहिल्यानेही सेन्सेक्स व निफ्टी नुकसानीत राहिले होते. दिवसभरातील कामगिरीनंतर बीएसई सेन्सेक्स दिवसअखेर 151.60 अंकांनी घसरुन निर्देशांक 61,033.55 वर बंद झाला. दुसऱया बाजूला राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी 45.80 अंकांनी प्रभावीत होत निर्देशांक 18,157.00 वर बंद झाला आहे.
मुख्य कंपन्यांमध्ये पॉवरग्रिडचे समभाग सर्वाधिक 4.06 टक्क्यांनी नुकसानीत राहिले यासोबतच टेक महिंद्रा, सनफार्मा, बजाज फिनसर्व्ह, एनटीपीसी आणि महिंद्रा ऍण्ड महिंद्रा यांचे समभाग घसरणीसोबत बंद झाले. याच्या विरुद्ध बाजूला आयटीसी, डॉ.रेड्डीज लॅब, कोटक महिंद्रा बँक, इंडसइंड बँक आणि एचसीएल टेक लाभात राहिले होते.
आशियातील अन्य बाजारांमध्ये चीनचा शांघाय कम्पोझिट, जपानचा निक्की आणि हाँगकाँगचा हँगसेंग नुकसानीत राहिले आहेत, तर दक्षिण कोरियाचा कोस्पी लाभासह बंद झाला. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्चे तेल 0.67 टक्क्यांनी घसरुन 94.72 डॉलर प्रति बॅरेलवर बंद झाले आहे. जागतिक तसेच देशातील पातळीवरील राजकीय तसेच आर्थिक क्षेत्रातील होत असणाऱया घडामोडींच्या प्रभावांचा परिणाम आगामी काळात शेअर बाजारातील कामगिरीवर होणार असल्याचा अंदाज बाजारातील अभ्यासक व्यक्त करत आहेत. यामुळे गुंतवणूकदारांनी सावध भूमाक घेत आपली गुंतवणुकीची दिशा निश्चित करणे आवश्यक ठरणार असल्याचेही त्यांनी म्हटले.









