सेन्सेक्स 270 अंकांनी घसरला : एफएमसीजी निर्देशांक बहरला
वृत्तसंस्था/ मुंबई
टेरिफचा तणाव रिलायन्स इंडस्ट्रिजच्या समभागाच्या कमकुवत कामगिरीमुळे भारतीय शेअर बाजारात शुक्रवारी घसरण दिसून आली. सेन्सेक्स 270 अंकांनी तर निफ्टी 164 अंकांनी घसरणीसोबत बंद झाला. एफएमसीजी निर्देशांक तेजीसह बंद होण्यात यशस्वी झाला. तर आयटी निर्देशांक घसरणीत होता. शुक्रवारी सरतेशेवटी मुंबई शेअरबाजाराचा 30 समभागांचा सेन्सेक्स निर्देशांक 270 अंकांनी घसरुन 79809 अंकांवर बंद झाला तर दुसरीकडे राष्ट्रीय शेअरबाजाराचा 50 समभागांचा निफ्टी निर्देशांक 164 अंकांनी घसरुन 24426 अंकांवर बंद झाला. निफ्टी बँक निर्देशांक 164 अंकांनी घसरत 53655 च्या स्तरावर बंद झाला होता. भारतीय शेअर बाजारात आठवड्याच्या शेवटच्या दिवशीही पडझड सुरुच राहिली होती.
विविध निर्देशांकांच्या कामगिरीकडे पाहता फक्त एफएमसीजी निर्देशांक तेव्हढाच तेजीत होता. इतर निर्देशांकांनी निराशादायी कामगिरी केल्याचे दिसून आले. एफएमसीजी निर्देशांक वधारण्यामागे ब्रिटानिया, आयटीसी आणि कोलगेट पामोलीव्ह या कंपन्यांच्या समभागांची तेजीसहची कामगिरी महत्त्वाची ठरली. निफ्टीत सलग तिसऱ्या सत्रात घसरण राहिली, ज्यात महिंद्रा आणि महिंद्रा व रिलायन्स या कंपन्यांचे समभाग सर्वाधिक घसरणीत राहिले हेते. या आठवड्यात एकंदर पाहता निफ्टी 1.7 टक्के इतका घसरलेला दिसला. पीएसयू बँकेचा निर्देशांक सलग सातव्या दिवशी घसरणीत राहिला होता. निफ्टी मिडकॅप 150 निर्देशांक या आठवड्यात 3 टक्के इतका नुकसानीत होता. अमेरिकेने व्यापार शुल्क लागू केल्याच्या तणावामुळे गुंतवणूकदारांमध्ये चिंता राहिली आहे. सकाळी सेन्सेक्स 70 अंक नुकसानीसह 80,010 अंकांवर खुला झाला होता. पण नंतर लगेचच सेन्सेक्स तेजीसह कार्यरत झाला. पण सत्राच्या शेवटी विक्रीवर भर दिला गेल्याने सेन्सेक्स अखेरच्या क्षणी कमकुवत होत बंद झाला.









