सेन्सेक्स 67 तर निफ्टी 26 अंकांनी नुकसानीत
वृत्तसंस्था/ मुंबई
चालू आठवड्यातील दुसऱ्या सत्रात मंगळवारी भारतीय भांडवली बाजारात प्रारंभीच्या तेजीला विराम देत सेन्सेक्स व निफ्टी यांचे निर्देशांक प्रभावीत होत बंद झाले. दिवसभरातील कामगिरीमध्ये चढउताराची स्थिती राहिली होती. कोणत्याही प्रकाराचे सकारात्मक वातावरण बाजारात राहिले नाही. मुख्य क्षेत्रांपैकी आयटी आणि धातू यांचे समभाग घसरणीसह बंद झाले.
ट्रेडिंगनुसार चालू सप्ताहात ख्रिसमस आणि नवीन वर्षांच्या स्वागताच्या तयारीसाठी सुट्ट्यांमुळे कोणतेही मोठे बदल बाजारात पहावयास मिळाले नाहीत. ख्रिसमस सणानिमित्त आज 25 डिसेंबर रोजी भांडवली बाजार बंद राहणार आहेत. याचाही परिणाम बाजारात राहिला.
मुख्य कंपन्यांच्या मदतीने बीएसई सेन्सेक्स दिवसअखेर 67.30 अंकांनी घसरुन निर्देशांक 78,472.87 वर बंद झाला आहे. दुसऱ्या बाजूला राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी हा 25.80 अंकांच्या नुकसानीसह निर्देशांक 23,727.65 वर बंद झाला आहे. यामध्ये 50 मधील 28 कंपन्या घसरणीत तर 22 कंपन्यांचे समभाग वधारले आहेत. दिगग्ज कंपन्यांपैकी पॉवरग्रिड कॉर्पचे समभाग सर्वाधिक घसरणीत राहिले. यासह स्टेट बँक, इन्फोसिस, टायटन, टाटा स्टील, अदानी पोर्ट, इंडसइंड बँक, अल्ट्राटेक सिमेंट, बजाज फायनान्स, मारुती सुझुकी, टेक महिंद्रा यांचे समभाग हे घसरणीसह बंद झाले.
अन्य कंपन्यांमध्ये मंगळवारी सेन्सेक्समधील टाटा मोटर्सचे समभाग सर्वाधिक तेजीत राहिले. यासह आयटीसी, नेस्ले इंडिया, एनटीपीसी, टीसीएस, झोमॅटो, अॅक्सिस बँक, महिंद्रा अॅण्ड महिंद्रा, कोटक बँक, सनफार्मा, एशियन पेन्ट्स, रिलायन्स इंडस्ट्रीज आणि आयसीआयसीआय बँक यांचे समभाग वधारले आहेत.
आशियातील बाजारांमध्ये जपानचा निक्केई 0.32 टक्के आणि कोरियाचा कोस्पी 0.061 टक्क्यांनी घसरुन बंद झाला आहे. तर चीनचा शांघाय कम्पोजिट 1.26 टक्क्यांनी तेजीत राहिला.









