सेन्सेक्स 197 तर निफ्टी 43 अंकानी प्रभावीत : जागतिक बाजारात संमिश्र पडसाद
मुंबई :
भारतीय भांडवली बाजारात चालू आठवड्यातील अंतिम सत्रात शुक्रवारी बीएसई सेन्सेक्स आणि एनएसई निफ्टी यांचे निर्देशांक प्रभावीत होत बंद झाले आहेत. बुधवारपासून सुरु असलेल्या भारतीय रिझर्व्ह बँकेच्या पतधोरण बैठक शुक्रवारी समाप्त झाली आणि यावेळी आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रा यांनी व्याजदर कपातीचा निर्णय सादर केला. परंतु या निर्णयानंतरही बाजारात म्हणावी तशी तेजी राहिली नाही. बाजार घसरणीसह बंद झाला असल्याने पतधोरण बैठकीवर बाजार नाराज असल्याचे दिसून आले. दिग्गज कंपन्यांच्या मदतीने बीएसई सेन्सेक्स दिवसअखेर 197.97 अंकांनी घसरुन निर्देशांक 77,860.19 वर बंद झाला आहे. दुसऱ्या बाजूला राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी हा दिवसअखेर 43.40 अंकांच्या नुकसानीसोबत निर्देशांक 23,559.95 वर बंद झाला आहे. सेन्सेक्समधील 30 शेअर्सपैकी 11 शेअर्स वधारले आणि 19 शेअर्स घसरले आहेत. निफ्टीतील 50 शेअर्सपैकी 17 शेअर्स वधारले आणि 32 शेअर्स घसरले.
व्यवहार सत्रात पीएसयू समभाग ओएनजीसीमध्ये सर्वाधिक घसरण नोंदवण्यात आली. तो 2.84 टक्क्यांनी घटून 248.90 वर बंद झाला, तर आयटीसी लिमिटेडचे शेअर्स 2.33 टक्क्यांनी घसरून 430.85 वर बंद झाले. तसेच, स्टेट बँक ऑफ इंडिया 2.01 टक्के वर बंद झाला, तर ब्रिटानियाचे शेअर्स 1.73 टक्क्यांनी नुकसानीत राहिले. त्याचवेळी, अदानी पोर्ट्सचे शेअर्स 1.55 टक्के घसरून 1,146 वर बंद झाले. धातूंमध्ये तेजी, पीएसयू बँकेच्या निर्देशांकात मोठी घसरण राहिली. आरबीआय चलनविषयक धोरण समितीने कोरोना महामारीनंतर पहिल्यांदाच रेपो दरात 25 बेसिस पॉइंट्सची कपात केली आहे. व्याजदरात कपात केल्यानंतर वित्तीय शेअर्समध्ये घसरण झाली आहे, ज्याने बाजार घसरणीसह बंद झाला. क्षेत्रीय निर्देशांकांबद्दल बोलायचे झाले तर, निफ्टी रिअॅल्टी 2.19 टक्के सर्वात जास्त घसरला आणि ग्राहकोपयोगी वस्तू 1.82 टक्क्यांने घसरला. ऑटो आणि एफएमसीजी सुमारे 1 टक्क्यांसह नुकसानीत होते. दरम्यान फार्मा आणि खासगी बँकांचे समभाग काहीसे तेजीत होते.
आशियाई बाजारात घसरण झाली आहे. जपानचा निक्केई 0.44 टक्के आणि कोरियाचा कोस्पी 0.31 टक्क्यांनी प्रभावीत झाला आहे. त्याच वेळी, चीनचा शांघाय कंपोझिट इंडेक्स वाढीसह कार्यरत होता.









