लेफ्टनंट गव्हर्नरांकडून 314 अर्जांना मंजुरी
नवी दिल्ली / वृत्तसंस्था
दिल्लीत आता मार्केट आणि रेस्टॉरंट 24 तास सुरू राहणार आहेत. लेफ्टनंट गव्हर्नर व्ही. के. सक्सेना यांनी 314 अर्जांना मंजुरी दिली आहे. यामध्ये ऑनलाईन शॉपिंग, डिलिव्हरी शॉप्स, हॉटेल्स, रेस्टॉरंट आणि वाहतूक सेवांशी संबंधित गोष्टींचा समावेश आहे. लेफ्टनंट गव्हर्नर यांच्या कार्यालयाने सोमवारी या निर्णयाची माहिती दिली. यातील काही अर्ज 2016 पासून प्रलंबित होते. या निर्णयाशी संबंधित अधिसूचना 7 दिवसांच्या आत जारी करण्याचे आदेश नायब राज्यपालांनी दिले आहेत. संबंधित अर्जांवर विहित मुदतीत निर्णय घेण्यात यावा, असेही लेफ्टनंट गव्हर्नरांनी म्हटले आहे. मंजुरीसाठी प्राप्त अर्जांपैकी एकूण 346 अर्ज कामगार विभागाकडे प्रलंबित होते. त्यामध्ये 2016 मधील 18, 2017 मधील 26, 2018 मधील 83, 2019 मधील 25, 2020 मधील 4 आणि 2021 मधील 74 अर्जांचा समावेश आहे.









