सेन्सेक्स 554 अंकांनी तेजीत : आयटी निर्देशांकाची चमक
वृत्तसंस्था/ मुंबई
ऑटो आणि आयटी निर्देशांकांच्या दमदार कामगिरीचा लाभ भारतीय शेअर बाजाराने सोमवारी आठवड्याच्या पहिल्या दिवशी पुरेपूर उठवल्याचे दिसून आले. दोन्ही निर्देशांकात तेजी होती तर सेन्सेक्स 554 अंकांनी मजबूतीसोबत बंद झाला. ऑगस्टमधील वाहन विक्री चांगली झाल्याने त्याचे परिणाम कंपन्यांच्या समभागांवर सोमवारी सकारात्मक दिसून आले.
सोमवारी सरतेशेवटी मुंबई शेअर बाजाराचा 30 समभागांचा सेन्सेक्स निर्देशांक 554 अंकांच्या मजबुतीसोबत 80364 अंकांवर बंद झाला तर दुसरीकडे राष्ट्रीय शेअरबाजाराचा 50 समभागांचा समावेश असलेला निफ्टी निर्देशांकही आनंदाच्या भरात 198 अंकांनी वाढत 24625 अंकांवर बंद झाला. निफ्टी निर्देशांकात 50 पैकी 42 समभाग तेजीसह बंद झाले हेते. सेन्सेक्समध्ये महिंद्रा, टाटा मोटर्स आणि ट्रेंट यांचे समभाग सर्वाधिक तेजीत होते. सनफार्मा, आयटीसी व हिंदुस्थान युनिलिव्हर यांचे समभाग मात्र घसरणीत होते. निफ्टीत एनटीपीसी, टायटन व डॉ. रे•िज लॅब्ज यांचे समभाग दमदार तेजीत होते. इंडसइंड बँक, भारती एअरटेल व अदानी एंटरप्रायझेस सर्वाधिक नुकसानीत होते. निफ्टी मिडॅकप100 1.97 टक्के व स्मॉलकॅप100 निर्देशांक 1.57 टक्के इतका तेजीसह बंद झाला.
निर्देशांकांची कामगिरी
विविध निर्देशांकांची सोमवारची कामगिरी पाहिल्यास फार्मा आणि मीडिया या निर्देशांकांमध्ये घसरण होती. ऑटो निर्देशांक 2.8 टक्के, कंझ्युमर ड्युरेबल्स 2.08 टक्के, मेटल निर्देशांक 1.64 टक्के व आयटी निर्देशांक 1.59 टक्के तेजीसोबत बंद झाले. ऑटो निर्देशांकाला मजबुती प्राप्त करण्यामध्ये बजाज ऑटो, हिरो मोटोकॉर्प, टाटा मोटर्स, आयशर मोटर्स यांनी हातभार लावला होता.
आशियाई बाजारात घसरण
जागतिक बाजारात आशियाई बाजारावर दबावाचे सावट होते. जपानचा निक्केई 0.92 टक्के, दक्षिण कोरीयाचा कोस्पी 0.85 टक्के इतका घसरणीत होता.









