अंतिम सत्रही नुकसानीतच : जागतिक बाजारात मिळताजुळता कल
वृत्तसंस्था/ मुंबई
जग आता पुन्हा एकदा युद्धाच्या छायेखाली वावरत आहे. इस्रायल व हमास यांच्यामधील युद्धाचा वणवा हा जगभरातील आर्थिक गणित बिघडवणारा ठरत आहे. याचाच प्रभाव हा भारतीय भांडवली बाजारातील कामगिरीवर होत असल्याचे दिसून येत आहे. शुक्रवारी अंतिम सत्रात जागतिक बाजारातील संकेतामुळे भारतीय बाजारात घसरण राहिली आहे.
आयटी आणि बँक समभागांमध्ये घसरण राहिल्याचा फटका हा बीएसई सेन्सेक्सला बसला असून दिवसअखेर 126.65 अंकाच्या घसरणीसोबत निर्देशांक 66,282.74 वर बंद झाला. दुसऱ्या बाजूला राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी 42.95 अंकांच्या नुकसानीसोबत निर्देशांक 19,751.05 वर बंद झाला आहे. 13 प्रमुख क्षेत्रांच्या निर्देशांकांपैकी आठ निर्देशांक घसरणीत राहिले. तर टाटा मोर्ट्सचे समभाग 5 टक्क्यांनी वधारले आहेत. बंधन बँकेचे समभाग 5 टक्क्यांनी नुकसानीत राहिले आहे.
अमेरिकेत चलनाचे भाव वाढण्याच्या काळजीने भारतीय गुंतवणूकदार प्रभावीत झाले आहेत. याचाच परिणाम हा भारतीय शेअर बाजारातील कामगिरीवर झाला आहे. दिग्गज समभागांमधील 30 समभागापैकी 16 समभाग हे नुकसानीत राहिले आहेत. तर 14 समभाग वधारले आहेत. प्रमुख कंपन्यांमध्ये टाटा मोर्ट्स 4.66 टक्क्यांनी वधारले, यावेळी इंडसइंड बँक, एचसीएल टेक, नेस्ले इंडिया, मारुती सुझुकी आदीचे समभाग हे 1 टक्क्यांपेक्षा अधिकने वधारले आहेत. तसेच अॅक्सिस बँक 2.28 टक्के, टीसीएस, सनफार्मा, बजाज फायनान्स, बजाज फिनसर्व्ह, पॉवरग्रिड कॉर्प, एअरटेल हे समभाग वधारले होते.
तिमाही निकालाकडे लक्ष
विविध कंपन्यांचे आता तिमाही अहवाल सादर करण्यात येत आहेत. यामध्ये काही कंपन्यांनी जाहीर केले आहेत तर काही आगामी आठवड्यामध्ये करणार असल्याचे संकेत आहेत. यामुळे गुंतवणूकदारांना आपली भूमिका ही जागतिक पातळीवरील राजकीय व अन्य घटनांचा मागोवा घेऊनच निश्चित करावी लागणार आहे.









