सातारा :
सध्या खासदार उदयनराजे आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे हे दोघेही एकत्र आहेत. मात्र, याच दोघांमध्ये आणि दोघांच्या कार्यकर्त्यांमध्ये 2016 मध्ये आनेवाडी टोलनाक्यावरुन सुरुची राडा प्रकरण झाले होते तर 2023 मध्ये बाजार समितीच्या विकास कामाच्या भूमिपूजनावरुन वाद झाला होता. त्या दोन्ही प्रकरणात सातारा न्यायालयात दोन्ही राजे हजर झाले होते. सुरुची राडा प्रकरणातील दोन प्रकरणे ही वरच्या न्यायालयात पाठवण्यात आली तर बाजार समितीचे प्रकरण बी समरी अहवालाने निकाली निघाले. यावेळी दोन्ही राजेंच्या कार्यकर्त्यांची उपस्थिती होती.
2016 च्या कोजागिरी पौर्णिमेच्या वेळी दुपारी सुरु झालेला आनेवाडी टोलनाक्यावरुन वाद रात्री उशिरा सुरुची बंगल्याच्याबाहेर थांबला होता. त्यावेळी दोन्ही गटातील कार्यकर्त्यांवर पोलिसांत गुन्हे परस्पर विरोधात तक्रारी दाखल झाल्या होत्या. पोलिसांच्यावतीने एक तक्रार दाखल झाली होती. अशा तक्रारीवरुन पोलिसांनी दोन्ही बाजूकडच्या कार्यकर्त्यांची दिवाळी कारागृहात घालवली होती. त्यानंतर 22 जून 2023 रोजी सातारा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या विकास कामाच्या भूमिपूजनावेळी दोन्ही राजे एकमेकांसमोर आले होते. यावेळी भूमिपूजनाचे साहित्याची मोडतोड केली होती. परस्पर विरोधात तक्रारी दाखल झाल्या होत्या. अशा दोन महत्वाच्या केसेस सातारा पोलीस दप्तरी नोंद होत्या. त्या प्रकरणी शनिवारी खासदार उदयनराजे व त्यांचे कार्यकर्ते तसेच सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे व त्यांचे कार्यकर्ते सातारा न्यायालयात हजर झाले होते. त्यामध्ये सुरुची राडा प्रकरणामध्ये दोन गुन्हे हे दोन्ही गटाकडून एकमेकांच्या विरोधात होते. त्या प्रकरणी सेशन कोर्टात ही दोन्ही प्रकरणी शनिवारी गेली आहेत. तर एक प्रकरण हे पोलिसांनी दाखल केलेल्या गुह्याचे खालच्याच न्यायालयात आहे. तसेच सातारा बाजार समितीच्या विविध विकास कामावरुन खासदार उदयनराजे आणि मंत्री शिवेंद्रराजे यांचे कार्यकर्ते दि. 22 जुन 2023 रोजी सकाळी 9 वाजण्याच्या सुमारास एकत्र आल्याने वाद झाला होता.
त्या प्रकरणी परस्पर विरोधात गुन्हे दाखल करण्यात आले होते. पोलिसांनी या दोन्ही बाजूच्या गुह्याचा तपास करुन बी समरी फाईल तयार केली होती. त्यानुसार न्यायालयात हे प्रकरण गेल्यानंतर न्यायालयाने खासदार उदयनराजे आणि मंत्री शिवेंद्रराजे यांनाही नोटीस बजावली होती. त्यानुसार खासदार उदयनराजे आणि मंत्री शिवेंद्रराजे व त्यांचे कार्यकर्ते हे न्यायालयात हजर झाले. पोलिसांनी काढलेल्या बी समरी अहवालानुसार दोन्ही बाजूवर असलेल्या केसमध्ये काही तथ्य नसल्याचा निकर्ष काढत दोन्ही गुन्हे निकाली काढण्यात आल्याचे त्यांच्या वकिलांनी सांगितले.








