निफ्टी 32 अंकांनी तेजीत : धातू निर्देशांक तेजीत
वृत्तसंस्था / मुंबई
आठवड्याच्या पहिल्या दिवशी सोमवारी सकाळच्या सत्रात चांगली तेजी प्राप्त केलेला भारतीय शेअर बाजार अखेरच्या क्षणी अल्पशा तेजीसोबत बंद होताना दिसला. सेन्सेक्स 76 अंकांनी वाढत बंद झाला. ऑटो समभागांनी निफ्टीला सावरण्यात हातभार लावला तर आयटी समभागांमध्ये विक्री सुरुच राहिली होती.
सोमवारी सरतेशेवटी मुंबई शेअरबाजाराचा 30 समभागांचा सेन्सेक्स निर्देशांक 76 अंकांनी वाढत 80787 अंकांवर बंद झाला तर दुसऱ्या बाजुला राष्ट्रीय शेअरबाजाराचा 50 समभागांचा निफ्टी निर्देशांक 32 अंकांच्या वाढीसोबत 24773 च्या स्तरावर बंद झालेला दिसला. ऑटो निर्देशांक 3 टक्के इतका वाढत म्हणजेच 866 अंकांनी वाढत 27189 अंकांवर बंद झाला. बँक निफ्टी निर्देशांक 72 अंकांनी वाढत 54186 च्या स्तरावर बंद झाला होता. बँक निफ्टीत 12 समभागांमध्ये 10 समभाग तेजीत राहिले.
ऑटो निर्देशांक दमदार तेजीत
ऑटो निर्देशांक सातत्याने सलगच्या सत्रात तेजीवर स्वार आहे. ऑटो कंपन्यांचे समभाग सोमवारी जोरदार दौडताना दिसले. जीएसटी सुधारीत कराच्या अंमलबजावणीच्या उत्साहात कंपन्यांचे समभाग तेजीत होते. महिंद्रा, आयशर व मारुती सुझुकी यांच्या समभागांनी तर बाजारात उच्चांकाला गवसणी घातली होती. भारत फोर्ज, अशोक लेलँड, मदरसन सुमी, टाटा मोटर्स यांचीही कामगिरी निर्देशांकाला मजबुती देऊ शकली. मॉर्गन स्टॅनलेने धातू कंपन्यांबाबत सकारात्मक कल प्रदर्शित केल्याचा परिणाम सोमवारी या कंपन्यांच्या समभागावर दिसला. जेएसडब्ल्यू स्टील 3 टक्के इतका वाढला होता. विविध निर्देशांकात पाहता ऑटो, पीएसयू बँक, मेटल मजबूतीसोबत बंद झाले तर आयटी, एफएमसीजी व फार्मा निर्देशांक घसरणीत राहिले.
सेन्सेक्समधील 30 समभागांपैकी 16 समभाग हे घसरणीत होते तर उर्वरीत 14 मात्र तेजीत राहिले. निफ्टीमधील 50 समभागांमध्ये 25 समभागांत खरेदी दिसून आली. अमेरिकेतील फेडरल रिझर्व्ह व्याजदर कपात करु शकते, अशा शक्यतेने बाजारात सकारात्मकता पसरलेली दिसली.









