सेन्सेक्स 386 तर निफ्टी 119 अंकांनी नुकसानीत
मुंबई :
जागतिक बाजारातील नकारात्मक संकेतांमुळे बुधवारी भारतीय शेअर बाजार सलग चौथ्या सत्रात घसरणीसह बंद झाला. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी नवीन एच-1बी व्हिसा नियमांमध्ये केलेल्या बदलांमुळे आयटी शेअर्समध्ये दबाव दिसून आला. तसेच, ऑटो आणि वित्तीय सेवा शेअर्समध्ये नफा बुकिंगनेही बाजार खाली आला. दरम्यान परदेशी गुंतवणूकदारांकडून सतत विक्री होत असल्याने बाजारावर दबाव आला आहे.
बाजार तज्ञांचे म्हणणे आहे की, विदेशी गुंतवणूकदारांकडून विक्री झाल्यामुळे सणासुदीच्या हंगामाशी संबंधित उपभोग मागणीत सुधारणा होण्याची शक्यता कमकुवत होऊ शकते. मंगळवारी विदेशी पोर्टफोलिओ गुंतवणूकदारांनी (एफपीआय) विक्री केली. त्यांनी 3,551 कोटी रुपयांचे शेअर्स विकले. सप्टेंबरमध्ये भारतातील ही त्यांची सर्वात मोठी एका दिवसाची विक्री होती.
बीएसई सेन्सेक्स 200 अंकांनी वाढून 81,917.65 वर उघडला. अखेरच्या क्षणी 386.47 अंकांनी घसरून 81,715.63 वर बंद झाला. याप्रमाणे, राष्ट्रीय शेअर बाजारचा निफ्टी देखील 112.60 अंकांनी प्रभावीत होत 25,056.90 वर बंद झाला.
सेन्सेक्स कंपन्यांमध्ये, टाटा मोटर्स, भारत इलेक्ट्रॉनिक्स, अदानी एंटरप्रायझेस, विप्रो, जिओ फायनान्शियल सर्व्हिसेस, बजाज ऑटो, इंडसइंड बँक, हिरो मोटोकॉर्प, अल्ट्राटेक सिमेंट, अॅक्सिस बँक आणि टेक एम हे आज निफ्टी निर्देशांकात सर्वाधिक घसरण करणारे होते. ते 1 टक्क्यांवरून 2.6 टक्क्यांपर्यंत घसरले. तर पॉवर ग्रिड, हिंदुस्तान युनिलिव्हर, एनटीपीसी, एचसीएल टेक, मारुती यांचे शेअर्स वधारले.
निफ्टी मिडकॅप निर्देशांक 0.98 टक्क्यांनी आणि निफ्टी स्मॉलकॅप निर्देशांक 0.67 टक्क्यांनी घसरून बंद झाला. क्षेत्रीय आघाडीवर, निफ्टी एफएमसीजी निर्देशांक वाढला आणि सर्व क्षेत्रे नुकसानीसह बंद झाली. निफ्टी रिअॅलिटी निर्देशांक 2.5 टक्क्यांनी घसरून बंद झाला. त्यानंतर, निफ्टी ऑटो निर्देशांक 1.15 टक्क्यांनी आणि निफ्टी प्रायव्हेट बँक निर्देशांक 0.8 टक्क्यांनी घसरून बंद झाला.
जागतिक बाजारपेठांचा प्रवास
आशियाई बाजारांची सुरुवात घसरणीने झाली. फेडरल रिझर्व्हचे अध्यक्ष जेरोम पॉवेल यांनी ‘इक्विटीच्या किमतींमध्ये लक्षणीय वाढ झाली आहे’ असे सांगितल्यावर अमेरिकन बाजारपेठेत तोटा दिसून आला. जपानचा निक्केई 225 निर्देशांक 0.4 टक्क्यांनी घसरला तर हाँगकाँगचा हँगसेंग 0.35 टक्क्यांनी घसरला. त्याच वेळी, दक्षिण कोरियाचा कोस्पी निर्देशांक 0.45 टक्क्यांनी घसरला.









