सेन्सेक्समध्ये 99 अंकांची तेजी : आयटी कंपन्या नफ्यात
वृत्तसंस्था/ मुंबई
दोन दिवसांच्या घसरणीच्या प्रवासानंतर सोमवारी आठवड्याच्या पहिल्या दिवशी भारतीय शेअरबाजार तेजीसह बंद झाला. आयटी, रियल्टी कंपन्यांच्या तेजीचा लाभ बाजाराला झाला.
सोमवारी सरतेशेवटी मुंबई शेअरबाजाराचा 30 समभागांचा सेन्सेक्स निर्देशांक 99 अंकांच्या तेजीसह 62,724 अंकांवर तर राष्ट्रीय शेअरबाजाराचा निफ्टी निर्देशांक 38 अंकांच्या वधारासह 18,601 अंकांवर बंद झाला होता. सोमवारी गुंतवणूकदारांच्या संपत्तीत 1.28 लाख कोटी रुपयांची भर पडल्याची माहिती देण्यात आली. आयटी, टेक, रियल्टी, ऑइल अँड गॅस व टेलिकॉम कंपन्यांचे समभाग तेजीत होते. कन्झुमर ड्युरेबल्स व बँकिंग क्षेत्रातील समभाग मात्र घसरणीत होते. बीएसईवर मिडकॅप व स्मॉलकॅप निर्देशांक अनुक्रमे 0.54 टक्के आणि 0.72 टक्के तेजीसह व्यवहार करत होते. बीएसईवर लिस्टेड कंपन्यांचे बाजार भांडवल मूल्य 12 जूनला वाढून 288.01 लाख कोटी रुपयांवर पोहचलं होतं. 9 जूनला ते 286.73 कोटी रुपये इतके होते.
सेन्सेक्समधील 30 पैकी 20 समभाग तेजीसह बंद झाले. यात एचसीएल टेक चे समभाग सर्वाधिक 2.58 टक्के इतके वाढताना दिसले. यानंतर इन्फोसिस, एनटीपीसी, महिंद्रा आणि महिंद्रा व टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेसचे समभाग तेजीत राहिले होते. दुसरीकडे पॉवरग्रिड कॉर्पचे समभाग सर्वाधिक घसरणीत राहिले होते. यापाठोपाठ मारुती सुझुकी, टायटन, लार्सन टुब्रो, एचडीएफसी बँक यांचे समभाग घसरणीत राहिले होते. या आठवड्यात अमेरिकेतील फेडरल बँकेची बैठक होत असून त्यात व्याजदराबाबत निर्णय होणार आहे. त्यावर गुंतवणूकदारांचे लक्ष असणार आहे. याखेपेला फेडरल बँक व्याजदर जैसे थे ठेवणार असल्याचे मत मांडले जात आहे.
जागतिक बाजारात अमेरिकेतील डोव्ह जोन्स 40 अंकांनी तर नॅसडॅक निर्देशांक 20 अंकांनी तेजीत होता. तर युरोपियन बाजारातदेखील तेजीचा कल होता. आशियाई बाजारात निक्की, स्टेट टाइम्स, हँगसेंग यांचे निर्देशांक तेजीसह कार्यरत होते. तर कोस्पी व शांघाई कम्पोझीट यांचे निर्देशांक मात्र घसरणीत होते.









