सेन्सेक्स 2000 अंकांनी होता कोसळला : भारती एअरटेलचे मूल्य वधारले
वृत्तसंस्था / मुंबई
शेअर बाजारातील दहापैकी नऊ कंपन्यांचे बाजार भांडवल मूल्य 2 लाख 94 हजार 170 कोटी रुपयांनी कमी झाले असल्याचे दिसून आले आहे. यामध्ये आयटी क्षेत्रातील कंपनी टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस यांच्या बाजार भांडवल मूल्यात सर्वाधिक घसरण पाहायला मिळाली आहे.
सेन्सेक्समध्ये पडझड
शुक्रवारी संपलेल्या आठवड्यात मुंबई शेअर बाजाराचा 30 समभागांचा सेन्सेक्स निर्देशांक एकंदर पाच दिवसात 2050 अंकांनी म्हणजेच 2.64 टक्के इतका घसरलेला होता तर दुसरीकडे राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी निर्देशांक 614 अंकांनी म्हणजेच 2.61 टक्क्यांनी घसरणीत होता.
रिलायन्स, टीसीएस नुकसानीत
घसरण झालेल्या कंपन्यांमध्ये टीसीएससह रिलायन्स इंडस्ट्रीज, इन्फोसिस, बजाज फायनान्स, आयसीआयसीआय बँक, एचडीएफसी बँक, हिंदुस्थान युनिलिव्हर, स्टेट बँक आणि आयटीसी यांचा समावेश आहे. दूरसंचार क्षेत्रातील कंपनी भारती एअरटेल मात्र बाजार भांडवल मूल्यामध्ये वाढ करू शकली आहे.
टीसीएसचे बाजारमूल्य 1,10,351 कोटी रुपयांनी कमी होत 11,93,769 कोटी रुपयांवर घसरले होते. यासोबतच रिलायन्स इंडस्ट्रीचे बाजार भांडवल मूल्य 95,132 कोटी रुपयांनी कमी होत 16,30,244 कोटी रुपयांवर तर इन्फोसिसचे बाजारमूल्य 49,050 कोटींनी कमी होत 6,03,178 कोटी रुपयांवर घसरले होते.
बँकांचे भांडवल मूल्य घटले
बजाज फायनान्सचे बाजार भांडवल मूल्य 14,127 कोटींसह 5 लाख 40 हजार 588 कोटींवर आणि आयसीआयसीआय बँकेचे भांडवल 9,503 कोटींनी कमी होत 9,43,264 कोटी रुपयांवर स्थिरावले होते. खासगी क्षेत्रातील बँक एचडीएफसी बँकेचे बाजारमूल्य 8800 कोटींनी कमी होत 13,90,408 कोटींवर तर हिंदुस्थान युनिलिव्हरचे मूल्य 3500 कोटी रुपयांनी कमी होत 5,27,354 कोटी रुपयांवर आले. स्टेट बँकेचे बाजार भांडवल 3391 कोटी रुपयांनी कमी होत 6,85,232 कोटी रुपयांवर राहिले.








