सेन्सेक्स 1497 अंकांनी होता घसरला : रिलायन्सच्या भांडवलात घट
वृत्तसंस्था/ मुंबई
देशातील आघाडीवरच्या दहा पैकी आठ कंपन्यांचे बाजार भांडवल मूल्य मागच्या आठवड्यामध्ये 2 लाख 25 हजार कोटी रुपयांनी कमी झालेले पाहायला मिळाले. अमेरिकेने लादलेल्या 50 टक्के व्यापारी शुल्काचा परिणाम शेअर बाजारावर मोठ्या प्रमाणात मागच्या आठवड्यात पाहायला मिळाला. यामध्ये सर्वाधिक घसरण रिलायन्स इंडस्ट्रीज यांच्या बाजार भांडवल मूल्यामध्ये पाहायला मिळाली. एचडीएफसी बँक, आयसीआयसीआय बँक, भारती एअरटेल, एसबीआय यांच्या बाजारभांडवल मूल्यात सुद्धा घसरण पाहायला मिळाली तर दुसरीकडे टीसीएस आणि हिंदुस्थान युनिलिव्हर लिमिटेड यांच्या बाजार भांडवल मूल्यात मात्र वाढ पाहायला मिळाली.
यांच्या मूल्यात घसरण
बाजार भांडवलात आघाडीवर असणाऱ्या रिलायन्स इंडस्ट्रीजचे बाजार भांडवल मूल्य मागच्या आठवड्यात 70,707 कोटी रुपयांनी कमी होत 18 लाख 36 हजार कोटी रुपयांवर घसरले. यासोबतच खासगी बँक एचडीएफसी बँकेचे बाजार भांडवल 47 हजार 483 कोटी रुपयांनी कमी होत 14 लाख 61 हजार कोटी रुपयांवर घसरले. आयसीआयसीआय बँकेचे बाजारमूल्य 27,135 कोटी रुपयांनी कमी होत 9 लाख 98 हजार कोटींवर तर भारती एअरटेलचे बाजारमूल्य 24,947 कोटी रुपयांनी कमी 10 लाख 77 हजार कोटी रुपयांवर घसरले होते. जीवन विमा क्षेत्रातील कंपनी एलआयसीचे बाजार भांडवल मूल्य 23,656 कोटी रुपयांनी कमी होत 5 लाख 39 हजार कोटींवर तर एसबीआयचे बाजारमूल्य 12,692 कोटींनी कमी होत 7 लाख 41 हजार कोटींवर स्थिरावले होते. बजाज फायनान्सचे भांडवल मूल्य 10,471 कोटींनी कमी होत 5 लाख 45 हजार कोटींवर आणि इन्फोसिसचे बाजारमूल्य 7540 कोटी रुपयांनी कमी होत 6लाख 10 हजार कोटींवर घसरले.
यांच्या बाजार मूल्यात वाढ
तर दुसरीकडे आयटी क्षेत्रातील कंपनी टीसीएस आणि एचयुएल यांचे बाजार भांडवल मूल्य वाढलेले पाहायला मिळाले. टीसीएसचे बाजारमूल्य मागच्या आठवड्यात 11126 कोटी रुपयांनी वाढत 11 लाख 16 हजार कोटी रुपयांवर पोहोचले होते आणि हिंदुस्थान युनिलिव्हर लिमिटेडचे बाजार भांडवलमूल्य 7319 कोटी रुपयांनी वाढत 6 लाख 25 हजार कोटी रुपयांवर पोहोचले.









