वृत्तसंस्था / मुंबई
आघाडीवरच्या दहापैकी सात कंपन्यांचे बाजार भांडवल मूल्य मागच्या आठवड्यात 1 लाख 06 हजार 250 कोटी रुपयांनी वाढले असल्याचे पाहायला मिळाले. मागच्या आठवड्यात बजाज फायनान्स आणि रिलायन्स इंडस्ट्रीज या कंपन्यांचे बाजार भांडवल मूल्य सर्वाधिक वाढलेले दिसून आले.
कोणाचे मूल्य वाढले, घटले
मागच्या आठवड्यात पाहता मुंबई शेअरबाजाराचा बीएसई सेन्सेक्स निर्देशांक 901 अंकांनी वाढला होता. तर दुसरीकडे राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी निर्देशांक 314 अंकांनी वाढलेला दिसून आला. दहा कंपन्यांपैकी रिलायन्स इंडस्ट्रीज, एचडीएफसी बँक, भारती एअरटेल, आयसीआयसीआय बँक, स्टेट बँक ऑफ इंडिया, बजाज फायनान्स व एलआयसी या कंपन्यांच्या बाजार मूल्यामध्ये वाढ पाहायला मिळाली तर दुसरीकडे आयटी क्षेत्रातील कंपनी टीसीएस आणि इन्फोसिस व एफएमसीजी कंपनी हिंदुस्थान युनिलिव्हर यांच्या बाजार भांडवलामध्ये मात्र घसरण पाहायला मिळाली.
बजाज फायनान्सचे बाजार भांडवल
मूल्य 37 हजार 960 कोटी रुपयांनी वाढत 5 लाख 83 हजार 451 कोटी रुपयांवर पोहोचले. रिलायन्स इंडस्ट्रीचे बाजारमूल्य 23,343 कोटी रुपयांनी वाढत 18,59,767 कोटी रुपयांवर पोहोचले. एचडीएफसी बँक 17580 कोटी रुपयांनी वाढत 14 लाख 78 हजार 444 कोटी रुपयांवर आणि एलआयसीचे भांडवल मूल्य 15,559 कोटी रुपयांनी वाढत 5,54,607 कोटी रुपयांवर स्थिरावले. स्टेट बँकेचे बाजार मूल्य 4,246 कोटी रुपयांनी वाढत 7 लाख 44 हजार 864 कोटींवर पोहोचले. दुसरीकडे टीसीएसचे बाजारमूल्य 13,007 कोटींनी कमी होत 11,02,955 कोटी रुपयांवर घसरले होते.









